घटस्फोटित महिलांची फसवणूक करणारा जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 06:55 AM2018-11-16T06:55:37+5:302018-11-16T06:55:51+5:30

मुंबईचा रहिवासी असलेला कुलकर्णी हा विविध विवाह नोंदणी संकेतस्थळांवरून घटस्फोटित महिलांची माहिती मिळवायचा. स्वत:

Duplicate women are cheating on the net | घटस्फोटित महिलांची फसवणूक करणारा जाळ्यात

घटस्फोटित महिलांची फसवणूक करणारा जाळ्यात

Next

मुंबई : घटस्फोटित महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा, त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या ठगाला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महेश कुलकर्णी असे अटक आरोपीचे नाव आहे़ त्याने आतापर्यंत ७ हून अधिक महिलांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे़

मुंबईचा रहिवासी असलेला कुलकर्णी हा विविध विवाह नोंदणी संकेतस्थळांवरून घटस्फोटित महिलांची माहिती मिळवायचा. स्वत: उद्योगपती असल्याचे भासवून त्यांच्याशी ओळख वाढवायचा. मुंबईसह गोव्यात हॉटेल असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संपादन करायचा. पुढे त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. त्याने अशाच प्रकारे बंगळुरू येथील एका उद्योजक महिलेशी ओळख केली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. विमानाच्या प्रवासाला कंटाळल्याचे सांगून तिची कार घेतली. महिलेने विश्वास ठेवून तिची महागडी कार त्याला दिली. ती कार घेऊन तो मुंबईत आला. त्यानंतर त्याने तिचे फोन उचलणे बंद केले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने अनोखी शक्कल लढवली. तिने २५ लाख रुपयांची गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने त्याला अनोळखी क्रमांकावरून कॉल केला. भेटण्यासाठी विमानतळ परिसरात बोलावून घेतले. तोही लालसेपोटी कार घेऊन तेथे धडकला. महिलेने तो येण्यापूर्वी तेथील पोलिसांना त्याच्याबाबत सांगितले होते. तो येताच, तिने त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचा बनाव उघडकीस आला. त्याने आतापर्यंत ७ महिलांना साडेतेरा लाखांचा गंडा घातल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी विमानतळ पोलीस अधिक तपास करीत आहेत. त्याने आतापर्यंत अशा प्रकारे शेकडो महिलांना गंडविल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने ते अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Duplicate women are cheating on the net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.