मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे ‘मेगाहाल’ आज मध्यरात्रीपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:55 AM2018-06-16T06:55:21+5:302018-06-16T06:55:21+5:30

मध्य रेल्वेच्या ब्लॉकसंबंधी विविध कामांना शनिवारी मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. शनिवार-रविवारच्या मध्यरात्री दिवा स्थानकात पादचारी पुलासाठी ६ तासांचा आणि रविवारी दिवसा परळ स्थानकातील नव्या फलाटासाठी ८ तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

 Due to megablock the passengers started 'Megahal' from midnight today | मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे ‘मेगाहाल’ आज मध्यरात्रीपासून सुरुवात

मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे ‘मेगाहाल’ आज मध्यरात्रीपासून सुरुवात

Next

मुंबई : मध्य रेल्वेच्या ब्लॉकसंबंधी विविध कामांना शनिवारी मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. शनिवार-रविवारच्या मध्यरात्री दिवा स्थानकात पादचारी पुलासाठी ६ तासांचा आणि रविवारी दिवसा परळ स्थानकातील नव्या फलाटासाठी ८ तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील लोकल वाहतूकही रविवारी ६ तास बंद राहणार आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावरही जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांचे ‘मेगाहाल’ होणार आहेत.
दिवा स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यासाठी शनिवारी रात्री १२ वाजून ४५ मिनिटे ते ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत सहा तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येईल. ब्लॉकचा फटका मेल-एक्स्प्रेसलाही बसेल. शनिवार आणि रविवारी मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस व मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात येणार आहे.
परळ स्थानकात नव्या फलाटांकरिता रुळांच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी सकाळी ९ वाजून ३० मिनिटे ते ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत आठ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात धिम्या मार्गावरील लोकल भायखळा आणि माटुंगा स्थानकादरम्यान जलद मार्गावर व माटुंगा स्थानकानंतर पुन्हा धिम्या मार्गावर वळविण्यात येईल. ब्लॉक काळात सर्व लोकल फेऱ्या नेहमीच्या थांब्यासह अन्य स्थानकांवरही थांबतील. यामुळे लोकल फेºया सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.
याशिवाय रविवारी हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान ११ वाजून ३४ मिनिटे ते दुपारी ४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत एकही लोकल धावणार नाही. चुनाभट्टी /वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्गावरील वाहतूक ११ वाजून १० मिनिटे ते ४ वाजून १० मिनिटांपर्यंत बंद असेल. प्रवाशांच्या सोईसाठी पनवेल, कुर्ला येथून विशेष लोकल सोडण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना हार्बर तिकीट, पासवर पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची मुभा आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत अप आणि डाउन धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घोषित केला आहे. या काळात धिम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येईल. तर, काही लोकल फेºया रद्द करण्यात येणार आहेत.

या डाउन लोकल रद्द

शनिवार
सीएसएमटी-कल्याण रात्री ९ वाजून ५४ मिनिटे
सीएसएमटी-अंबरनाथ रात्री ११ वाजून ५२
रविवारी
विद्याविहार - टिटवाळा पहाटे ५ वाजून १२ मिनिटे
सीएसएमटी-अंबरनाथ पहाटे ५ वाजून ४० मिनिटे
विद्याविहार-कल्याण पहाटे ६ वाजून ३७ मिनिटे

या एक्स्प्रेस रद्द
शनिवार - पुण्याहून मुंबईकडे येणारी इंद्रायणी एक्स्प्रेस
शनिवार - भुसावळहून मुंबईकडे येणारी भुसावळ पॅसेंजर
रविवार - मुंबईहून पुण्याकडे जाणारी इंद्रायणी एक्स्प्रेस
रविवार - मुंबईहून भुसावळकडे जाणारी भुसावळ पॅसेंजर

या अप लोकल रद्द
शनिवार : कल्याण - सीएसएमटी रात्री ११ वाजून ५ मिनिटे
रविवार : कल्याण - सीएसएमटी पहाटे ४ वाजून ४१ मिनिटे , ६ वाजून ४ मिनिटे, ६ वाजून १५ मिनिटे; अंबरनाथ -सीएसएमटी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटे, ४ वाजून ११ मिनिटे; टिटवाळा -सीएसएमटी पहाटे ४ वाजून ०१ मिनिटे

Web Title:  Due to megablock the passengers started 'Megahal' from midnight today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.