घाटकोपर स्थानकावर गर्दीचा दुहेरी भार, प्रवाशांना मनस्ताप : मेट्रोच्या वाढत्या प्रवाशांमुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 05:10 AM2017-10-16T05:10:50+5:302017-10-16T05:12:10+5:30

मध्य रेल्वे मार्गावरील दादर आणि कुर्ला या रेल्वे स्थानकांनंतर गर्दीचे स्थानक म्हणून घाटकोपर रेल्वे स्थानकाची ओळख आहे. महत्त्वाचे म्हणजे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही पहिली मेट्रो घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडण्यात आली आहे.

 Dual load of crowd at Ghatkopar station, distress to passengers: Failure to manage crowd due to increasing metro traffic | घाटकोपर स्थानकावर गर्दीचा दुहेरी भार, प्रवाशांना मनस्ताप : मेट्रोच्या वाढत्या प्रवाशांमुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यात अपयश

घाटकोपर स्थानकावर गर्दीचा दुहेरी भार, प्रवाशांना मनस्ताप : मेट्रोच्या वाढत्या प्रवाशांमुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यात अपयश

googlenewsNext

- कुलदीप घायवट 
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दादर आणि कुर्ला या रेल्वे स्थानकांनंतर गर्दीचे स्थानक म्हणून घाटकोपर रेल्वे स्थानकाची ओळख आहे. महत्त्वाचे म्हणजे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही पहिली मेट्रो घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडण्यात आली आहे. परिणामी घाटकोपर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा ताण वाढला असून, येथील गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. बेशिस्त रिक्षाचालक, अनधिकृत फेरीवाले आणि जिन्यांची दुरवस्था हे घटकही घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या समस्येत भर घालत असून, घाटकोपर रेल्वे स्थानकातील गर्दीचे व्यवस्थापन होणार कधी, असा संतप्त सवाल करत मेट्रो आणि बुलेट टेÑनऐवजी इथल्या लोकल सुधारा, असा सूर घाटकोपर येथील रेल्वे प्रवाशांनी लावला आहे.
घाटकोपर स्थानकात गर्दी तर असतेच; त्याच्या जोडीला अरुंद जिने, अपुरे रेल्वे पोलीस कर्मचारी, अस्वच्छता, स्वयंचलित जिना नाही, खुर्च्या तुटलेल्या, जुने झालेले छप्पर अशा समस्यांची भर आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आठवड्यातील कोणताही दिवस असो, घाटकोपर स्थानकावर गर्दी असतेच. मेट्रो स्थानकामुळे मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकावर दुप्पट गर्दी होते. तसेच लाखोंच्या संख्येत असलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही दोन ते तीन रेल्वे पोलीस कर्मचाºयांच्या खांद्यावर असते. त्यामुळे एल्फिन्स्टन-परळच्या घटनेची पुनरावृत्ती घाटकोपर स्थानकावर होण्याची भीती आहे. येथे गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वे पोलीस कर्मचारी वाढवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
मेट्रो स्थानकाची २०१४ साली बांधणी करण्यात आली. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचे घाटकोपर स्थानक त्याला जोडण्यात आले. मात्र आता येथील गर्दी वाढतच असून, या स्थानकावर मेट्रोच्या गर्दीचा ताण येत आहे. घाटकोपर स्थानकाबाहेर रिक्षावाले व फेरीवाले प्रवाशांशी हुज्जत घालतात. शेअर रिक्षा वेड्यावाकड्या लावल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडताना अडचणीला सामोेरे जावे लागते. या समस्येची तक्रार कुठे करायची व तक्रारीचे निवारण होईल का, हाच प्रश्न प्रवाशांना सतावत आहे.
मेट्रो स्थानकांतील वेळेचे नियोजन, शिस्तबद्धपणा, स्वच्छता, गर्दीचे व्यवस्थापन ज्याप्रकारे केले गेले आहे; त्याप्रकारे मध्य रेल्वेमध्ये बदल करून उपाययोजना करून विकास करावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
गर्दीमध्ये विद्यार्थी
घाटकोपर स्थानकाच्या परिसरात झुनझुनवाला महाविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालय, शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानिकेतन महाविद्यालय अशा प्रकारच्या अनेक शाळा व महाविद्यालये आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी रेल्वेचा प्रवास करून घाटकोपर स्थानक गाठतात. परंतु घाटकोपर स्थानकाला उतरल्यावर अरुंद पुलावरून चढ-उतार करताना विद्यार्थ्यांना धक्काबुक्कीला सामोरे जावे लागते. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प, प्रोजेक्टदेखील या गर्दीमुळे फाटतात, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.


सुधारणेसाठी पाठपुरावा

घाटकोपर स्थानकाच्या सुधारणेसाठी आमच्या वरिष्ठ नेत्यांसह मी सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. रेल्वे प्रशासकीय अधिकारी फेरीवाल्यांवर तात्पुरती कारवाई करतात व नंतर पुन्हा पूर्वीसारखी स्थिती होते. फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा प्रश्नही यातून निर्माण होतो. त्यामुळे यावर धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. जेणेकरून फेरीवाल्यांच्या उपजीविकेचे साधन टिकेल व प्रवाशांचा त्रासदेखील कमी होईल. रिक्षा, दुकानदारांचा त्रासदेखील कमी करण्याकडे आमचा कल आहे. नवीन सुविधांसाठी चर्चेतून आम्ही मार्ग काढणार आहोत.
- आ. राम कदम, घाटकोपर

फर्स्टक्लासवाले हैराण
सेकंड क्लासमध्ये गर्दीचे प्रमाण जास्त असल्यामुळे सेकंड क्लास तिकीटधारक फर्स्टक्लासच्या डब्यात बसून प्रवास करतात. त्यामुळे फर्स्टक्लासचे तिकीट असलेल्या प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने टी.सी.ची संख्या वाढवावी व अशा प्रवाशांवर कारवाई करावी, अशी मागणी फर्स्टक्लास तिकीटधारक प्रवाशांनी केली आहे.


एटीव्हीएम मशीन बंद
अनेकदा तक्रार करूनही एटीव्हीएम मशीन बंद असते. त्यामुळे तिकीट खिडकीसमोरील भल्यामोठ्या रांगेत उभे राहून तिकीट काढावे लागते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो.

फेरीवाले मोकाट
फेरीवाले घाटकोपर स्थानकालगतच उभे असतात. फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे या गर्दीतून प्रवाशांना प्रवास करणे कठीण होत आहे. फेरीवाले स्थानकांवर कचºयाचे ढिगारे ठेवून अस्वच्छता करतात. प्रशासनाने कारवाई केल्यानंतर काही वेळातच फेरीवाले आपल्या दुकानाचे बस्तान स्थानकावर व स्थानकांच्या बाहेर लावतात. समस्या सुटण्याऐवजी वाढतच जाते.

मेट्रोची गर्दी
घाटकोपर रेल्वे स्थानकावर मधल्या पुलाद्वारे मेट्रो स्थानक जोडले गेलेले आहे. त्यामुळे संपूर्ण दिवस या पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. याचा त्रास मध्य रेल्वेच्या प्रवाशांना होतो. कारण मध्य रेल्वे स्थानकांतील प्रवाशांना फलाट क्रमांक ३, ४ वरून फलाट क्रमांक १, २ कडे येण्या-जाण्यासाठी या गर्दीतून प्रवास करावा लागतो.


रेल्वे प्रशासनाने सीएसएमटीकडील पहिल्या ब्रिजच्या रुंदीकरणाचे काम केले पाहिजे. ब्रिजवरील विक्रेते हटवावे. जेणेकरून चालण्यासाठी पुरेशी जागा मिळेल. ब्रिजवरून चालताना पायºयांवरून पाय घसरतो. त्याच्या सुधारणेकडे लक्ष दिले पाहिजे.
- श्रीकांत जाधव, प्रवासी


घाटकोपर पश्चिमेकडील बाहेरील भागात रिक्षा वेड्यावाकड्या उभ्या असतात. परिणामी गर्दी वाढते. पब्लिक ब्रिजवर लाइट नसल्यामुळे चोºया होतात. पश्चिमेला सकाळी तिकीट खिडक्या जास्त प्रमाणात खुल्या कराव्यात. पूर्वेकडील फे म सिनेमाजवळ अनधिकृत पार्किंग असल्यामुळे गर्दी वाढते.
- शुभम चव्हाण, प्रवासी

घाटकोपर ते कर्जत, कसारा अशा लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात आल्या तर प्रवाशांना दिलासा मिळू शकतो. रेल्वे प्रशासनाला न जुमानता पुलावर अनधिकृत फेरीवाले, विक्रेते बसतात. त्यामुळे गर्दीची अडचण निर्माण होते.
- सतीश ठोंबरे, प्रवासी

मेट्रोमुळे येथील गर्दीमध्ये वाढ झाली आहे. दिवसेंदिवस ब्रिजची अवस्था खराब होत आहे. रेल्वे प्रशासनाने मूलभूत सेवा पुरवल्या पाहिजेत. सकाळी-संध्याकाळी वाढणाºया गर्दीचे व्यवस्थापन केले पाहिजे.
- शोहेब शेख, प्रवासी

जुन्या पुलांची रुंदी कमी आहे. मेट्रो आणि रेल्वे पुलामुळे लोकांना येताना-जाताना त्रास होतो. सरकार मेट्रोसाठी आणि बुलेट ट्रेनसाठी पैसे खर्च करते. पण जुन्या पुलांसाठी खर्च करत नाही. - राहुल डोंगरे, प्रवासी

ंरेल्वे प्रशासनाने गंजलेल्या पुलांची डागडुजी करणे व देखभाल करणे गरजेचे आहे. गाड्यांची संख्या आणि डबे वाढवणे आवश्यक आहे. लोकलची आणि मेट्रोची गर्दी यामुळे प्रवाशांची प्रवास करताना कोंडी होते. - रोहन डोंगरे, प्रवासी

अनधिकृत फेरीवाल्यांमुळे गर्दीत भर पडते. फेरीवाल्यांबाबत महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे. महापालिकेची गाडी स्थानकाच्या बाहेर उभी केली जाते. महानगरपालिकेचे थोडे दुर्लक्ष झाले तर लगेच हे फेरीवाले हातपाय पसरतात. बेशिस्त रिक्षाचालकांची आरटीओमध्ये तक्रार केली आहे. शेअर रिक्षा व मीटर रिक्षा असे रिक्षांचे दोन थांबे करणे आवश्यक आहे.
- बिंदू चेतन त्रिवेदी,
स्थानिक नगरसेविका

रेल्वे प्रशासनाने ब्रिज दुुरुस्ती किंवा नवीन ब्रिज बांधला पाहिजे. उत्तम वेळापत्रक आणि गर्दीचे व्यवस्थापन केले पाहिजे. मुंबई मेट्रो, एसी लोकल सुरू करण्याआधी लोकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे. स्टेशनची नावे बदलण्यापेक्षा मूलभूत सुविधा पुरवाव्यात.
- अमर पुरी, प्रवासी

ठाणे दिशेकडील पादचारी पुलावर संध्याकाळी गर्दुल्ले असतात. याकडे रेल्वे प्रशासनासोबत पोलीस यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.
- महेंद्रकुमार जाधव, प्रवासी

येथे गर्दीची समस्या मोठी आहे. सुधारणा करणे गरजेचे आहे. लोकलपेक्षा मेट्रोचा प्रवास सुखाचा वाटतो. त्यामुळे मेट्रोसारख्या सुधारणा लोकलमध्ये करणे गरजेचे आहे.
- पंकज माळी, प्रवासी

स्वच्छतागृहे, गर्दीचे व्यवस्थापन, फेरीवाल्यांचा उन्माद, पादचारी पुलांचे समायोजन, सुरक्षा याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
- सचिन काकड, प्रवासी
 

Web Title:  Dual load of crowd at Ghatkopar station, distress to passengers: Failure to manage crowd due to increasing metro traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.