प्रायोजकांच्या नावाखाली सुरक्षेकडे दुर्लक्ष नको!, समन्वय समितीने सुनावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 03:03 AM2018-08-17T03:03:31+5:302018-08-17T03:04:01+5:30

दहीकाला उत्सवाच्या तयारीसाठी बाल-गोपाळांनी सरावाला सुरुवात केली असून बहुतेक मंडळांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Do not ignore security in the name of sponsors! Coordination Committee has said | प्रायोजकांच्या नावाखाली सुरक्षेकडे दुर्लक्ष नको!, समन्वय समितीने सुनावले

प्रायोजकांच्या नावाखाली सुरक्षेकडे दुर्लक्ष नको!, समन्वय समितीने सुनावले

Next

मुंबई : दहीकाला उत्सवाच्या तयारीसाठी बाल-गोपाळांनी सरावाला सुरुवात केली असून बहुतेक मंडळांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रायोजक नसल्याने सुरक्षा साधने खरेदी करता येत नसल्याचे कारण देणाऱ्या पथकांना दहीहंडी समन्वयक समितीने चांगलेच सुनावले आहे. इतर खर्च कमी करून सुरक्षा साधनांना प्राधान्य देण्याचा सल्ला समितीचे सचिव सुरेंद्र पांचाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.
पांचाळ म्हणाले, गेल्या वर्षी उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने बहुतेक दहीकाला उत्सव आयोजकांनी आयोजनातून माघार घेतली होती. मात्र यंदा मोठ्या संख्येने आयोजन व्हावे, म्हणून समिती आयोजकांसह बैठका घेत आहेत. त्यात बहुतेक मोठ्या आयोजकांनी हंडीचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. मात्र प्रायोजक नसल्याचे कारण देत पथकांनी सुरक्षा साधने खरेदी करत नसल्याचे
कारण देणे अयोग्य आहे. मंडळांकडून टी-शर्ट, हाफ पँट आणि कित्येक वस्तूंसाठी जास्तीचा खर्च केला जातो. त्याला आवर घालत मंडळांनी पूर्वीप्रमाणे सण साजरा करण्यात काहीच हरकत नसल्याचेही पांचाळ यांनी सांगितले.
परिणामी, गोविंदा पथकांनी अधिकाधिक सराव करून स्वत:चे नाव कमावण्याचा सल्ला समितीने दिला आहे. पथकामधील सर्व गोविंदांचा विमा काढून सरावावेळी चेस्ट पॅड, हेल्मेट यांचा वापर करण्याचे आवाहन समितीकडून केले जात आहे. त्यासाठी समितीचे सदस्य बहुतेक गोविंदा पथकांसोबत विभागीय बैठका घेत आहेत.

सराव शिबिराकडे लक्ष
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनानिमित्त मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडी सराव शिबिरांचे आयोजन केले जाते. अशा आयोजकांना भेटून आयोजनस्थळी क्रेन, मॅट, रुग्णवाहिका अशा सर्व सुरक्षा साधनांची पूर्तता करण्याचे आवाहन समितीकडून केले जात आहे. तसेच सराव शिबिरादरम्यान पथकांकडून १४ वर्षांखालील गोविंदांना थरावर चढवले जात नाही ना? यावर समिती लक्ष ठेवून असेल.

संकल्पची माघार
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासन आदेश निघाला नसल्याने अद्याप नियमांबाबत संभ्रमता आहे. त्यामुळे वरळीतील संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येणार नाही. शासनाने गेल्या वर्षभरात कोणतीही तप्तरता दाखविलेली नाही. त्यामुळे यंदाही आयोजन करणार नाही.
- सचिन अहिर, अध्यक्ष, संकल्प प्रतिष्ठान, वरळी

Web Title: Do not ignore security in the name of sponsors! Coordination Committee has said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.