दिवाळीतील आतषबाजीने वाढवला आगीचा धोका 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 08:17 PM2018-11-12T20:17:16+5:302018-11-12T20:17:46+5:30

आगीच्या एकूण १९६ घटनाच; फटाक्यांमुळे ५० ठिकाणी उडाला भडका  

Diwali fires increase the risk of fire | दिवाळीतील आतषबाजीने वाढवला आगीचा धोका 

दिवाळीतील आतषबाजीने वाढवला आगीचा धोका 

Next

मुंबई - प्रदूषणमुक्त दिवाळीच्या आवाहनाला हरताळ फासत मुंबईकरांनी जोरदार आतषबाजी केली. मात्र या पाच दिवसांत मुंबईत तब्बल १९६ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. यापैकी ५० ठिकाणी फटाक्यांमुळे आगीचा भडका उडाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा अधिक असल्याने चिंता व्यक्त होत आहे. सुदैवाने या आगी किरकोळ स्वरूपाच्या असल्याने कोणती मोठी दुर्घटना झालेली नाही. 

दिवाळीत ८ ते १० वाजेपर्यंतच फटके वाजवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. तसेच दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करण्याचे आवाहनही करण्यात येत असते. मात्र सर्व नियम झुगारून मुंबईत ६ ते ९ नोव्हेंबर या पाच दिवसांत फटाक्यांची आतषबाजी सुरु राहिली. लक्ष्मी पूजन आणि पाडव्याच्या दिवशी फटाके वाजवण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या दोन दिवसांत मुंबईत अनुक्रमे ५२ आणि ७४ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. दरवर्षी या काळात आग लागण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे मुंबई अग्निशमन दलाला डोळ्यांत तेल टाकून सतर्क राहावे लागत असते. 

धनत्रयोदशीच्या दिवसापासून मुंबईत फटके उडवण्यास सुरुवात झाली. यामुळे ३१ ठिकाणी आग लागण्याचे प्रकार घडले. तर भाऊबीजेच्या दिवशी आगीचे प्रमाण ३२ होते. या पाच दिवसांत फटाक्यांमुळे आगीचा भडका उडण्याचे प्रमाणही अधिक होते. मात्र यामध्ये १९० आगी किरकोळ स्वरूपाच्या होत्या. तर पाच ठिकाणी माध्यम स्वरूपाच्या व एका ठिकाणी मोठी आग लागली होती. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही मोठी दुखापत अथवा जीवितहानी झालेली नाही. 

*मुंबईतील आगीच्या घटनांची आकडेवारी(६ ते १० नोव्हेंबर)

६ नोव्हेंबर -  ३१

७ नोव्हेंबर -  ५२

८ नोव्हेंबर - ७४

९ नोव्हेंबर - ३२

१० नोव्हेंबर - ७

*एकूण आगीच्या घटना  १९६

फटाक्यांमुळे  - ५० आगीच्या घटना

*२०१६ ते २०१८ या काळातील आगी 

वर्ष आगीच्या घटना 
2016८३ 
201737
201850
एकूण१७०

 

 

Web Title: Diwali fires increase the risk of fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.