कामाचा दिवस असूनही मुंबई विद्यापीठात शुकशुकाट; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 02:18 AM2019-06-30T02:18:33+5:302019-06-30T02:18:47+5:30

मुंबई विद्यापीठातील कर्मचारी संघटना, अधिकारी असोसिएशन व शैक्षणिक कल्याणकारी संघ यांनी संयुक्त विद्यमाने राज्य शासनाने सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा व अन्य मागण्यांसाठी एक दिवसीय बंद केला.

Despite the work day, Mumbai University stops; Demand for implementation of Seventh Pay Commission | कामाचा दिवस असूनही मुंबई विद्यापीठात शुकशुकाट; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

कामाचा दिवस असूनही मुंबई विद्यापीठात शुकशुकाट; सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

Next

मुंबई : पाचवा शनिवार असूनही मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट आणि सांताक्रुझ कलिना कॅम्पसमध्ये आलेल्या असंख्य विद्यार्थी, तसेच पालकांच्या मनात आपण चुकून सुट्टीच्या दिवशी आलो की काय, अशी शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी सुरक्षारक्षकांकडे चौकशी केल्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी लाक्षणिक संपावर गेल्याचा उलगडा झाला.
एफवायची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी कलिना कॅम्पसमध्ये शनिवारी शैक्षणिक कामांकरिता गर्दी केली होती. मात्र, त्यांचे एकही काम न झाल्यामुळे त्रागा करतच त्यांनी घरचा रस्ता धरला. सोमवारी विद्यापीठात सर्व विभाग पूर्ववत कामांना सुरुवात होईल.
मुंबई विद्यापीठातील कर्मचारी संघटना, अधिकारी असोसिएशन व शैक्षणिक कल्याणकारी संघ यांनी संयुक्त विद्यमाने राज्य शासनाने सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा व अन्य मागण्यांसाठी एक दिवसीय बंद केला. सातवा वेतन आयोग लागू न झाल्याने राज्यभरातील १४ विद्यापीठांतील दहा हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. शनिवारी त्याचे मुंबईसह राज्यातील अकृषी विद्यापीठांत पडसाद उमटले. फोर्ट, विद्यानगरी संकुलात कामकाज विस्कळीत झाले. फोर्ट विभागातील सर्व प्रशासकीय, वित्त व लेखा विभाग बंद होते. विद्यानगरी संकुलातील ६० शैक्षणिक, परीक्षा विभाग, आयडॉल व इतर विभागातील सर्व प्रशासकीय काम बंद होते. या आंदोलनात १५०० पेक्षा जास्त कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

हजेरी पुस्तकात स्वाक्षरी, बायोमॅट्रिक मशिनमध्ये नोंद केली नाही
शनिवारी सकाळी १०.३० पासून सायंकाळी ५.४५ पर्यंत विद्यापीठाच्या मुख्य कार्यालयासमोर सर्वांनी एकत्र येऊन ठरवून दिलेल्या घोषणांचा उल्लेख करावा, शिस्तीचे पालन करावे. तसेच आंदोलनात सहभागी होताना हजेरी पुस्तकात स्वाक्षरी, बायोमेट्रिक मशिनमध्ये ‘थंब’ करू नये, असे ‘मुनोवा’ने सांगितले होते. त्याचे पालन कर्मचाºयांनी केले.

शासनाला दिलेल्या निवेदनात सातव्या वेतन आयोगासोबत आश्वासित प्रगती योजना शासनाने लागू करावी, अशी मागणी केली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास १५ जुलैपासून आमचे हे आंदोलन तीव्र करू.
- दीपक वसावे, अध्यक्ष मुंबई विद्यापीठ अधिकारी संघटना.

Web Title: Despite the work day, Mumbai University stops; Demand for implementation of Seventh Pay Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.