मुंबई : कोळी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात भेट घेतली. कोळी समाजाच्या समस्यांबाबत लवकरच ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन राष्टÑपतींनी शिष्टमंडळाला दिले.
केंद्रीय अन्नपुरवठा राज्यमंत्री साध्वी निरंजन जोती व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने महाराष्ट्रातील कोळी जमातीच्या जात पडताळणीसह विविध समस्यांबाबत सुमारे ४५ मिनिटे सविस्तर चर्चा केली. कोळी समाजाच्या विविध समस्यांबाबत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही समस्या कायम आहेत. राज्य सरकारकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळत नसल्याने आमच्या व्यथा मांडण्यासाठी राष्टÑपतींची भेट घेतल्याचे रमेश पाटील यांनी या वेळी सांगितले.
जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्रासंदर्भात अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी सविस्तर विवेचन करून राज्य शासन याबाबत आंधळी भूमिका घेत असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.
या वेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके व संजय वाडीकर आदी उपस्थित होते.