वाहतूककोंडीमुळे आग विझण्यास विलंब, तज्ज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 05:09 AM2018-06-14T05:09:44+5:302018-06-14T05:09:44+5:30

प्रभादेवी येथील ब्यू मॉन्ड इमारतीला बुधवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पुन्हा एकदा मुंबईमधील गगनचुंबी इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Delay in the Stop fire due to traffic congestion, expert opinion | वाहतूककोंडीमुळे आग विझण्यास विलंब, तज्ज्ञांचे मत

वाहतूककोंडीमुळे आग विझण्यास विलंब, तज्ज्ञांचे मत

Next

मुंबई : प्रभादेवी येथील ब्यू मॉन्ड इमारतीला बुधवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी पुन्हा एकदा मुंबईमधील गगनचुंबी इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अग्निशमन दलाकडून कित्येक तास आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, काही काळाने ही आग खालच्या मजल्याकडे सरकत होती. बराच काळ उलटूनही आग आटोक्यात येत नसल्याने सुरक्षा हा कळीचा मुद्दा झाला असून, येथील हाय प्रोफाइल इमारतींना आग लागल्यावर ती शमविण्यास अग्निशमन दलास लवकर यश येत नाही; किंवा अनेक अडथळे येतात, अशाच काहीशा मुद्द्यांवर ‘लोकमत’ने संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घेतली आहेत. या मतांमध्ये शहरातील वाढत्या वाहतूककोंडीमुळे आग शमविण्यास अडचणी येत असून, गगनचुंबी इमारतींची सुरक्षा धोक्यात असल्याचे म्हणणे मांडले आहे.
शहर अभ्यासक सीताराम शेलार यासंदर्भात म्हणाले की, तांत्रिक दृष्टीने पाहिले, तर अग्निशमन दलाची तांत्रिक क्षमता अजून विकसित झालेली नाही, असे वाटते; परंतु हे वास्तविक कारण नाही. वास्तविक कारण हे, ज्या पद्धतीने ‘हाय राइज’ (उंच इमारती) बनविण्यासाठी परवानगी दिली जाते, यात आहे. तसेच महापालिकेमध्ये हाय राइज नावाची कमिटीही स्थापन करण्यात आली आहे. यापूर्वी ९ मजल्यापासून ते ३२ मजल्यापर्यंत इमारतींना हाय राइज म्हटले जायचे; परंतु आता नवीन विकास आराखड्यानुसार ३२ मजल्यापेक्षा अधिक मजले असणाऱ्या इमारतींचा हाय राइजमध्ये समावेश करण्यात आला आहे. ज्या कमी मजल्याच्या इमारती आहेत, त्यांच्यामध्ये आगी लागल्या तर इमारतींच्या आतमध्ये आग विझविण्याच्या यंत्रणा असल्या पाहिजेत. यात पूणपणे नियोजनाचा अभाव आहे. परिणामी, संपूर्ण जबाबदारी ही अग्निशमन दलावर टाकताच येणार नाही. प्रभादेवी सारख्या उंच इमारतीमध्ये लागलेली आग विझविण्यास अग्निशमन दलाला बाहेरून यंत्रणा उभ्या करण्यासाठी वेळ हा लागतो, त्यामुळे आग जास्त भडकते. काचेच्या इमारतीमुळे सूर्यप्रकाश चांगला मिळतो. काचेच्या इमारतींना थंड ठेवण्यासाठी फार मोठी यंत्रणा निर्माण करावी लागते. त्यामुळे काचेच्या इमारतींना थंड ठेवण्यासाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ज्या इमारतीमध्ये विजेचा वापर जास्त तिथे आग लागण्याच्या घटना जास्त निर्माण होतात.
शहर नियोजनतज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी सांगितले की, आगीची तीव्रता ही इमारतीमध्ये कोणत्या गोष्टीला आग लागली यावर अवलंबून असते, तसेच जमिनीपासून जास्त उंचीच्या इमारती असतात, तिथे मोठ्या प्रमाणात वारा वाहत असतो. त्यामुळे ही आग त्वरित विझवता येत नाही. उंच इमारतीच्या वरच्या मजल्यावर अग्निशमन दलाची शिडी जाऊ शकते का? हा मूळ विषय आहे. समजा अग्निशमन दलाची शिडी तिथपर्यंत पोहोचली, तर पाणी पोहोचू शकेल का? या सगळ््या गोष्टी पाहणे गरजेचे आहे.

इमारतीत पारंपरिक साहित्य वापरणे गरजेचे

वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा यांच्या म्हणण्यानुसार, कुलाबा येथील वर्ल्ड ट्रेट सेंटर येथील अग्निशमन दलाच्या यंत्रणेमधील शिडीद्वारे पाण्याचा फवारा हा ३० मजल्यांपर्यंत जाऊ शकतो. शहरात झाले काय, तर भायखळ्याला मोठे अग्निशमन दलाचे केंद्र उभारणार आणि शहरात जागोजागी उंच इमारती उभ्या आहेत.
गोरेगावमध्येच ५० मजल्यांच्या इमारती झाल्या आहेत. तर इतक्या दूर जर अग्निशमन दलाच्या यंत्रणा पोहोचेपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरते. परदेशात आग विझवण्यास हॅलिकॉप्टरचा उपयोग केला जातो; परंतु आपल्या देशात तसे होत नाही.
आगी विझविण्यास होणाºया विलंबामागे शहरातील वाहतूककोंडी हे मुख्य कारण आहे. काचेच्या इमारती या आगीला प्रोत्साहन देण्याचे काम करतात, त्यामुळे उंच इमारतीच्या बांधकामामध्ये पारंपरिक बांधकाम साहित्य वापरले पाहिजे.

इमारतीत अद्ययावत अग्निशमन यंत्रणा हवी
आग लागल्याची घटना घडते, तेव्हा अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचायला वेळ लागतो. इमारत बांधताना अग्निशमन दलाकडून आग प्रतिबंधक काही नियम व अटी सांगण्यात येतात; परंतु इमारतीची ओसी मिळाली की लोक इमारतीचा नकाशा बदलून टाकतात. मुंबई शहरातील जागा चिंचोळ््या होऊ लागल्या आहेत, त्यामुळे अग्निशमन दलाच्या मोठ्या गाड्या घटनास्थळी लवकर पोहोचत नाहीत. काचेच्या इमारती या फक्त आपल्या देशात नसून परदेशातही आहेत; परंतु त्या प्रकारे अद्ययावत यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. इमारतीतील लोकांना आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली गेली पाहिजे.
- रमेश प्रभू, अध्यक्ष, महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन

Web Title: Delay in the Stop fire due to traffic congestion, expert opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.