ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - मुंबईतल्या तीन दुर्दैवी पर्यटक मुलींचा भूतानमध्ये अपघातात करूण अंत झाला आहे. या मुली ज्या कारमधून जात होत्या ती जवळपास 1000 फूट खोल दरीत कोसळली आणि तिन्ही मुली आणि ड्रायव्हर जागीच ठार झाले. दहा दिवसांपूर्वी ही दुर्घटना घडली. भूतानमध्ये फिरायला गेलेल्या या पर्यटक मुलींची नावे अनीसा जंजिरा, दिशा छट व नर्गिस अशी आहेत.
11 एप्रिल रोजी त्या भूतानमधल्या ठराविक स्थळी पोचणं अपेक्षित होतं. मात्र, त्या तिथं पोचल्या नाहीत तसेच तब्बल तीन दिवस त्यांच्याशी काही संपर्कही होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांचे कुटुंबिय व मित्रपरीवार चिंतेत होता. अखेर त्यांनी फेसबुकवर यासंदर्भात पोस्ट टाकल्यावर भूतानमधल्या काही परिचितांनी चौकशी सुरू केली आणि धागेदोरे मिळायला लागले. टेन्झी जाम या भूतानमधल्या फेसबुक फ्रेंडने वांगडू पासून 48 किलोमीटरवर एका कारचा अपघात झाल्याचे आणि ती कार एक हजार फूट दरीत  कोसळल्याची माहिती दिली. तसेच, या कारमध्ये असलेल्या तीन महिला पर्यटक व ड्रायव्हर यांचा मृत्यू झाल्याचेही कळवले.
स्थानिकांनी मृतदेहांना थिंपू नॅशनल हॉस्पिटलमध्ये हलवले होते. 
या अपघाताच्या वृत्ताने धक्का बसलेल्या या मुलींच्या कुटुंबियांनी भूतानला धाव घेतली. मात्र, परिस्थिती इतकी बिकट होती, की दोन मुलींवर भूतानमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले, तर एका मुलीचं पार्थिव मुंबईत आणण्यात आलं. या पर्यटक मुलींवर काळानं घातलेल्या या घावामुळे हळहळ व्यक्त होत आहे.