Dawood ibrahim nephew met jailed iqbal kaskar conveyed msg sources | दाऊद इब्राहिमनं पुतण्याद्वारे जेलमध्ये इकबाल कासकरसाठी पाठवला मेसेज - सूत्र
दाऊद इब्राहिमनं पुतण्याद्वारे जेलमध्ये इकबाल कासकरसाठी पाठवला मेसेज - सूत्र

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरची कारागृहात आणखी एक फरार गुंड अनीस इब्राहिमच्या मुलानं भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. अनीस इब्राहिमचा मुलगा आरिस दुबईमध्ये वास्तव्यास आहे. त्यानं इकबाल कासकरचा मुलगा रिजवानसोबत ठाणे कारागृहात इकबाल कासकरची भेट घेतली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांवर कोणताही खटला नसल्यानं त्यांच्यावर नजर ठेवणं अथवा कारवाई करण्याची गरज भासली नाही. मात्र अन्य सूत्रांच्या माहितीनुसार, खुद्द पोलिसांनाच याबाबतची माहिती हे दोघंही दुबईमध्ये परतल्यानंतर मिळाली आहे. 

दरम्यान, हे दोघं जण नेमक्या कोणत्या तारखेला कारागृहात आले होते, याची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकरला तीन साथीदारांसह ठाणे खंडणीविरोधी पथकाने (18 सप्टेंबर 2017) रात्री उशीरा भायखळा येथून अटक केली होती.  इकबाल कासकरने बिल्डरकडे चार फ्लॅटच्या स्वरुपात खंडणी मागितली होती, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. या घटनेमध्ये दाऊद इब्राहिमचा सहभाग आहे का याबाबत तपास सुरू आहे, दाऊदचा सहभाग आढळल्यास त्यालाही या प्रकरणात आरोपी केलं जाईल ,अशी माहितीदेखील पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली होती.  

मिळालेल्या माहितीनुसार या भेटीदरम्यान, अनीस इब्राहिमच्या मुलानं इकबालला मोठा भाऊ दाऊद इब्राहिमच्या नाराजी व चिंतेबाबत जाणीव करुन दिली. अनीस इब्राहिमच्या मुलानं इकबालला सांगितले की, इकबालच्या कारागृहातील सुरक्षिततेबाबत दाऊद इब्राहिम काळजीत आहे मात्र दुसरीकडे आपला मुलगा मोइनबाबत पोलिसांना माहिती दिल्याबाबत दाऊद नाराज असल्याचंही त्यानं सांगितले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान इकबाल सांगितले होते की, मोइन स्वतंत्र राहत असून तो आता मौलाना बनला आहे.   
 


Web Title: Dawood ibrahim nephew met jailed iqbal kaskar conveyed msg sources
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.