Dancers, Bolly Worlds' games around the world | ‘अर्धवटरावां’चा परदेशातही डंका, बोलक्या बाहुल्यांचे जगभरात खेळ
‘अर्धवटरावां’चा परदेशातही डंका, बोलक्या बाहुल्यांचे जगभरात खेळ

- अजय परचुरे

मुंबई : बोलक्या बाहुल्यांनी भारताचे नाव जगभरात पोहोचविलेल्या शब्दभ्रमकार रामदास पाध्येंच्या, ‘अर्धवटराव’ या तरुण बाहुल्याचे सध्या परेदशी नागरिक प्रचंड फॅन झाले आहेत. गेल्या वर्षी अर्धवटरावांनी वयाची सेंच्युरी गाठली. त्याचे जोरदार सेलिब्रेशनही मुंबईत करण्यात आले. अर्धवटराव आणि त्याची जोडीदार आवडाबाई या बाहुल्यांना भारतीयांनी तर या आधीच डोक्यावर घेतलेय. आज जागतिक वर्ल्ड पपेट दिवसानिमित्त अर्धवटरावांच्या काही आठवणींचा हा उजाळा...
अर्धवटरावांनी वयाची सेंच्युरी गाठल्यानंतर, रामदास पाध्ये आणि कुटुंबीयांनी अर्धवटरावांची महती साऱ्या जगाला कळावी, यासाठी ‘कॅरी आॅन पाध्ये’ या कार्यक्रमाचे प्रयोग परदेशात सादर करण्याचा निर्णय घेतला. परदेशातही अर्धवटरावांना तुफान प्रतिसाद मिळाला. गप्पा मारताना मध्येच डोळा मारणे, बोलता-बोलता आपली मान गरागरा फिरविणे, आपल्या बोलण्याने समोरच्याची टोपी उडविण्याच्या अर्धवटरावांच्या अनोख्या स्टाईलने भारतीयांसोबतच परदेशी प्रेक्षकांनाही खळखळून हसविले. त्यामुळेच मलेशिया, चीनमधल्या पपेट फेस्टिव्हलमध्ये पाध्येंनी भाग घेतला आणि आपल्या भारतीय बाहुल्यांना जगाच्या व्यासपीठावर एक मानाचे स्थान निर्माण करून दिले.
रामदास पाध्येंनी ‘कॅरी आॅन एंटरटेन्मेंट - रामदास पाध्ये लाइव्ह’ या कार्यक्रमाची आखणी केली. त्यांच्या या परदेशी मोहिमेमध्ये त्यांची पत्नी तथा प्रसिद्ध शब्दभ्रमकार अपर्णा पाध्ये, त्यांचा मुलगा शब्दभ्रमकार सत्यजित पाध्ये, त्यांची सून ऋजुता पाध्ये आणि रामदास पाध्येंचा लहान मुलगा परीक्षित पाध्ये या संपूर्ण पाध्ये कुटुंबीयांचा समावेश होेता.
त्यांच्या मोहिमेची सुरुवात मलेशियापासून झाली. तेथील रेनफॉरेस्ट वर्ल्ड पपेट कार्निवलमध्ये ते सहभागी झाले. या फेस्टिव्हलमध्ये अर्धवटरावांचा नुसताच सत्कारच झाला नाही, तर १०० वर्षांच्या या जगातील सर्वात जुन्या बाहुल्यावर एक विशेष शॉर्टफिल्मही दाखविण्यात आली. त्याला मलेशियातील लाखो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महोत्सवात पाध्ये कुटुंबीयांना ‘द बेस्ट पपेट फिल्म’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले. यानंतर, पाध्ये कुटुंबीयांनी मोर्चा वळविला तो चीनकडे. चीनमध्ये झालेल्या ‘क्वांनझो इंटरनॅशनल पपेट फेस्टिव्हल’मध्येही अर्धवटरावांचा दबदबा कायम राहिला. जगातील अनेक प्रसिद्ध शब्दभ्रमकार आणि बाहुल्यांचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होता, पण अर्धवटरावांच्या अचूक विनोदी टायमिंग आणि अचूक संवादफेकीमुळे चीनवासीयदेखील अर्धवटरावांच्या प्रेमात पडले. तेथेही पाध्ये कुटुंबीयांचा आणि अर्धवटरावांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

अशी झाली अर्धवटरावांची सुरुवात
आपल्या वडिलांची शब्दभ्रमकाराची परंपरा रामदास पाध्ये यांनीही कायम ठेवली. रामदास पाध्ये साधारण १७ वर्षांचे असताना, १ मे १९६७ रोजी त्यांनी मुंबईतील बिर्ला सभागृहात अर्धवटरावांना घेऊन आपला पहिला शो सादर केला होता. शब्दभ्रमकार कलेची सेवा रामदास पाध्ये गेली ५० वर्षे करत आहेत. वर्ल्ड पपेट दिवसाचे औचित्य साधून, रामदास पाध्ये अर्धवटराव आणि आपल्या अनेक प्रसिद्ध बाहुल्यांना घेऊन अजूनही काही देशांत जाणार आहेत.


आज जगभरात आमच्या बोलक्या बाहुल्यांना जो तुफान प्रतिसाद मिळतोय, ते पाहून खूप आनंद होतोय. माझ्या पुढच्या पिढीनेही अर्धवटरावांची ही जादू अशीच कायम ठेवावी, अशी माझी इच्छा आहे. माझी दोन्ही मुले आणि माझी सून हे काम मोठ्या आनंदाने करत आहेत. आमच्या या यशात रसिक प्रेक्षकांचाही वाटा तितकाच मोठा आहे.
- रामदास पाध्ये,
प्रसिद्ध शब्दभ्रमकार.


Web Title: Dancers, Bolly Worlds' games around the world
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.