VIDEO : कांदिवलीत पेट्रोल पंपावर सिलेंडरचा स्फोट, तीन जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 11:46 AM2018-10-20T11:46:50+5:302018-10-21T06:30:34+5:30

कांदिवली पश्चिमेकडील मिलाप पेट्रोल पंपावर शनिवारी सकाळी रिक्षामध्ये गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाला.

Cylinder explosion at petrol pump in Mumbai's Kandivali, three injured | VIDEO : कांदिवलीत पेट्रोल पंपावर सिलेंडरचा स्फोट, तीन जण जखमी

VIDEO : कांदिवलीत पेट्रोल पंपावर सिलेंडरचा स्फोट, तीन जण जखमी

मुंबई : रिक्षात सीएनजी गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट होऊन बेस्टच्या एका कर्मचाऱ्यासह तिघे जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी कांदिवलीतील एका पेट्रोल पंपावर घडली. आकस्मिक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत, परिस्थिती नियंत्रणात आणली.
दुर्घटनेत रिक्षाचालक अनिल शिवराम मोरे (वय ५७), बेस्ट कर्मचारी सोहेल शेख (५७) आणि पेट्रोलपंप कर्मचारी शैलेश तिवारी (२५) जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटामुळे रिक्षाचा चक्काचूर झाला असून, अन्य काही वाहनांचेही किरकोळ नुकसान झाले आहे.
कांदिवलीत मिलाप टॉकिजजवळील एच. पी. पेट्रोलपंपावर शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रिक्षाचालक मोरे रिक्षात, तर बेस्टमध्ये नोकरीला असलेले सोहेल शेख हे आपल्या कारमध्ये सीएनजी भरण्यासाठी रांगेत उभे होते. पेट्रोलपंप कर्मचारी रिक्षाचालक मोरे यांच्या रिक्षात सीएनजी गॅस भरत असताना, सीएनजी सिलिंडरचा स्फोट होऊन रिक्षाचा चक्काचूर झाला. पेट्रोपपंपावर आग लागली, अशी आरडाओरड सुरू झाली. स्फोट झालेल्या रिक्षाचे तुकडे पंपावर उभ्या असलेल्या ग्राहकांच्या दिशेने उडाले. या दुर्घटनेत मोरे, तिवारी आणि शेख जखमी झाले.
स्थानिकांनी दुर्घटनेची माहिती अग्निशमन दल आणि कांदिवली पोलिसांना दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत, जखमी झालेल्या मोरे यांच्यासह शेख आणि तिवारी यांना कांदिवलीच्या स्थानिक तुंगा रुग्णालयात दाखल केले. मोरे हे बोरीवली, पूर्व परिसरात पत्नी आणि मुलीसोबत राहतात. त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच बजाज कंपनीतून रिक्षा खरेदी केली होती. त्यामुळे घटनास्थळी बजाज, तसेच महानगर गॅसचे अधिकारीही दाखल झाले. ते स्फोटाचा अहवाल तयार करत असून, हा अहवाल पोलिसांना वर्ग केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
>चालकासह तिघे जखमी
पेट्रोलपंप कर्मचारी रिक्षाचालक मोरे यांच्या रिक्षात सीएनजी गॅस भरत असताना, सीएनजी सिलिंडरचा स्फोट होऊन रिक्षाचा चक्काचूर झाला. स्फोट झालेल्या रिक्षाचे तुकडे पंपावर उभ्या असलेल्या ग्राहकांच्या दिशेने उडाले. यात रिक्षा चालकासह तिघे जखमी झाले. स्फोटाच्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

Web Title: Cylinder explosion at petrol pump in Mumbai's Kandivali, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई