न्यायालयाने केली सुटका, तरीही पुन्हा अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 05:59 AM2018-06-17T05:59:57+5:302018-06-17T05:59:57+5:30

न्यायालयातून तीन वर्षांपूर्वीच निर्दोष मुक्तता होऊनही त्याला पुन्हा अटक करण्याचा पराक्रम गुन्हे शाखेने केला आहे.

The court has rescued, still arrested again | न्यायालयाने केली सुटका, तरीही पुन्हा अटक

न्यायालयाने केली सुटका, तरीही पुन्हा अटक

Next

- मनीषा म्हात्रे 
मुंबई : न्यायालयातून तीन वर्षांपूर्वीच निर्दोष मुक्तता होऊनही त्याला पुन्हा अटक करण्याचा पराक्रम गुन्हे शाखेने केला आहे. विशेष म्हणजे १३ वर्षांपासून फरार आरोपीला पकडल्याचे त्यांनी शनिवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले. या प्रकारामुळे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला.
वरळी परिसरात दिनेश गोविंद पटनी (३९) राहतो. पूर्वी तो कॉटनग्रीन परिसरात राहायचा. २००५ मध्ये त्याच्याविरुद्ध कलम ३२३ अंतर्गत काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात खटला सुरू झाला. अटकेच्या भीतीने पटनी पसार झाला. वॉण्टेड आरोपींच्या यादीत त्याचे नाव आले.
मे २०१५ मध्ये न्यायालयाने या गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर तीन वर्षांनी गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने त्याला शुक्रवारी वरळी नाका येथून अटक केली. त्यामुळे नेमके काय सुरू आहे, हेच लक्षात न आल्याने तोदेखील गोंधळून गेला. १३ वर्षांपासून फरार असलेल्या या आरोपीला पकडल्याचे गुन्हे शाखेने शनिवारी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले. आणि आरोपीला काळाचौकी पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र काळाचौकी पोलिसांनी त्याच्या कागदपत्रांची शहानिशा केली केल्यानंतर त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यातून त्याची ३ वर्षांपूर्वीच निर्दोष मुक्तता झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अखेर काळाचौकी पोलिसांनी त्याला सोडून दिले. घडलेल्या या प्रकाराबाबत आता गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस एकमेकांकडे बोट दाखवत आहेत.
>...म्हणूनच पकडले
वॉण्टेड असलेल्या आरोपींच्या यादीनुसार, आम्ही आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. तेव्हा त्याने अटकेच्या भीतीने आपण पळून गेलो होतो, असे सांगितले. दिलेल्या यादीत तो १३ वर्षांपासून फरार होता. त्यानुसार, आम्ही त्याला ताब्यात घेत काळाचौकी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची निर्दोष मुक्तता झाली याबाबत आम्हाला पोलीस ठाण्यातून कळविण्यात आले नसल्याचे गुन्हे शाखेच्या कक्ष ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांनी सांगितले.
।उपायुक्त म्हणतात
निर्दोष मुक्तता नाही
याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांच्याकडे विचारणा केली असता, आरोपीला आम्हीच पकडले असून तो गुन्ह्यातून सुटलेला नसल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
गुन्हे शाखा विसरली असावी
मे २०१५ मध्ये संबंधित आरोपीची दाखल गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. त्याबाबत आम्ही रेकॉर्डवरूनही त्याचे नाव कमी केले होते.
याबाबत गुन्हे शाखेलाही कळविले होते. कदाचित ते विसरले असावेत, असे काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप
उगळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: The court has rescued, still arrested again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक