देशाचे वित्तमंत्री झोपले आहेत का?; उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 04:59 AM2018-07-24T04:59:40+5:302018-07-24T04:59:54+5:30

डीटीआर कार्यालय महिन्याभरापासून बंद

Is the country's finance minister sleeping ?; High Court's angry question | देशाचे वित्तमंत्री झोपले आहेत का?; उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

देशाचे वित्तमंत्री झोपले आहेत का?; उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

Next

मुंबई : गेल्या महिन्यात बेलॉर्ड इस्टेट येथील डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल (डीआरटी) कार्यालयाच्या आवारात आग लागल्याने ते बंद करण्यात आले. मात्र, अद्याप ते कार्यान्वित करण्यात न आल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. देशाचे वित्तमंत्री झोपले होते का? असा संतप्त सवाल न्यायालयाने या वेळी केला.
मुंबईला देशाची आर्थिक राजधानी समजली जाते, तरीही २ जून रोजी डीआरटी कार्यालयाला आग लागल्याने, लवादाचे कामकाज बंद करण्यात आले आहे. बँक, अन्य वित्तीय संस्था व त्यांच्या ग्राहकांच्या कर्जवसुली संदर्भातील केसेस या लवादासमोर चालतात. डीआरटीसाठी दक्षिण मुंबईत अन्य ठिकाणी जागा देण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी विनंती करणारी याचिका डीआरटी बार असोसिएशने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने वरील सवाल केला.
केंद्र सरकार पर्यायी जागा केव्हा उपलब्ध करणार, अशी विचारणा न्यायालयाने केंद्र सरकारला केली. ‘आमच्यापुढे हा विषय येण्याऐवजी केंद्र सरकारने स्वत:हूनच याबाबत पुढाकार घ्यायला हवा होता. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. डीआरटीचे कामकाज ठप्प आहे... देशाचे वित्तमंत्री झोपले आहेत का?’ असे न्या. ओक यांनी म्हटले. न्यायालयाने केंद्र सरकारला २५ जूनपर्यंत डीआरटीसाठी पर्यायी जागा कुठे देण्यात येणार आहे, याची माहिती देण्याचे निर्देश दिले.

महत्वाच्या फायली आगीत खाक
या आगीत जळालेल्या आयकर विभागाच्या फायलींमध्ये नीरव मोदी व मेहुल चोक्सीच्या फायलीही असल्याची अफवा या वेळी पसरली होती. मात्र आयकर विभागाने ती फेटाळून लावली.
२ जून रोजी सिंधिया हाउसमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या आयकर विभागाला आग लागली होती. याच इमारतीमध्ये डीआरटी कार्यालयही होते. आगीचा फटका डीआरटीलाही बसला. या आगीमुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला २४ तास लागले. आयकर विभाग व डीआरटीच्या फायली या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.

Web Title: Is the country's finance minister sleeping ?; High Court's angry question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.