मोदींकडून गुरु अडवाणींचा वारंवार अपमान- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 06:34 PM2018-06-12T18:34:15+5:302018-06-12T18:35:00+5:30

भाजपामध्ये ज्येष्ठांचा अपमान; राहुल गांधींचा हल्लाबोल

congress president rahul gandhi mumbai booth workers bjp pm narendra modi atal bihari vajpayee lal krishna advani | मोदींकडून गुरु अडवाणींचा वारंवार अपमान- राहुल गांधी

मोदींकडून गुरु अडवाणींचा वारंवार अपमान- राहुल गांधी

मुंबई: भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा अपमान केला जातो, असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. 'लालकृष्ण अडवाणी मोदींचे गुरु आहेत. मात्र मोदी त्यांचाही आदर करत नाहीत, हे अनेक कार्यक्रमांमधून दिसून आलं आहे. काँग्रेसनं अडवाणींना भाजपापेक्षा अधिक आदर दिला,' असं राहुल म्हणाले. आज राहुल यांनी मुंबईत बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांना सन्मान दिला जात नाही, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा साधला. 'माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र ते भाजपाचे असूनही मी त्यांचा आदर करतो. कारण त्यांनी या देशाचे नेतृत्व करल्यानं ते देशाचे नेते ठरतात. त्यामुळेच मी काल एम्स रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हीच काँग्रेसची संस्कृती आहे,' अशा शब्दांमध्ये राहुल गांधी अप्रत्यक्षपणे मोदी आणि शहांवर शरसंधान साधलं. 

यावेळी राहुल गांधींनी बेरोजगारीच्या मुद्यावरुनही सरकारला लक्ष्य केलं. 'आज देशातील तरुणाला रोजगार हवा आहे. मात्र देशातील सर्व वस्तू मेड इन चायना आहेत. मी देशाच्या भविष्यासाठी काम करतो, असा विश्वास तरुणांच्या मनात आहे. त्यांना रोजगार मिळाल्यास आपण चीनशी स्पर्धा करु शकतो. मात्र भाजपाकडून फक्त तरुणांची माथी भडकावण्याचं, दोन समुदायांमध्ये हिंसाचार कसा होईल, यावरच लक्ष दिलं जातं आहे. मोदींना वाटतं मी पंतप्रधान आहे, त्यामुळे माझ्या भाषणावरच देश चालेल,' अशी टीका राहुल यांनी केली. 

Web Title: congress president rahul gandhi mumbai booth workers bjp pm narendra modi atal bihari vajpayee lal krishna advani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.