Colaba-Bandra-Seepz Metro Rail Project 3 'Krishnavtar' | कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो भुयारी मार्ग ३ प्रकल्पाचा ‘कृष्णा’वतार
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो भुयारी मार्ग ३ प्रकल्पाचा ‘कृष्णा’वतार

मुंबई- कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो भुयारी मार्ग ३ प्रकल्पाच्या भुयारी कामाला माहीम येथील नयानगरमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. मेट्रोच्या कामासाठी ‘कृष्णा वन’ आणि ‘कृष्णा टू’ या मशीनची मदत घेतली आहे. माहीम येथून प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत भुयारी मार्ग खोदण्यात येणार आहे. हा भुयारी मार्ग दोन ते अडीच किलोमीटर लांबीचा असून, मेट्रोच्या संपूर्ण भुयारी मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण केले जाईल. मेट्रो-३ प्रकल्पाचे खोदकाम टनेल बोअरिंग मशीनच्या मदतीने केले जात आहे. येथे दोन मशीन कार्यान्वित आहेत. ‘कृष्णा वन’ या मशीनद्वारे आतापर्यंत १२० मीटर भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून, ‘कृष्णा टू’ या मशीनद्वारे आतापर्यंत ७० मीटर भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मेट्रोचा एकूण भुयारी मार्ग हा ३३.५ किमी लांबीचा आहे. खोदकामाचा वेग हा भूगर्भातील खडकावर अवलंबून आहे. त्यामुळे ८ ते १४ मीटर दररोज काम करण्याची गती या मशीनची असेल. खडकांचा चुरा करण्याचे वैशिष्ट्य टर्नल बोअरिंग मशीनमध्ये आहे. भुयारी मेट्रोचे काम २ वर्षांत म्हणजे २०१९पर्यंत पूर्ण होईल. मेट्रो-३ ही डिसेंबर २०२१मध्ये धावेल, असा दावा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने केला आहे.


Web Title: Colaba-Bandra-Seepz Metro Rail Project 3 'Krishnavtar'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.