विधिमंडळामध्ये संघर्षशील नेत्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 05:12 AM2019-06-25T05:12:25+5:302019-06-25T05:21:41+5:30

‘तुमच्या सरकारचे मार्गदर्शक कोण?’ या प्रश्नावर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी दिलेले उत्तर खूप मार्मिक आहे. ‘जनतेने निवडून दिलेले, पण संख्याबळाअभावी विरोधी बाकावर बसलेले सन्माननीय सदस्य आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ हेच सरकारचे खरे मार्गदर्शक आहेत!’

 The choice of conflicting leaders | विधिमंडळामध्ये संघर्षशील नेत्यांची निवड

विधिमंडळामध्ये संघर्षशील नेत्यांची निवड

Next

देशातील राजकीय वर्तमान विद्वेषी, एकसुरी, वैरभाव जोपासणारे आणि विरोधकांचा उपमर्द करणारे असताना महाराष्ट्राच्या विधिमंडळात सोमवारी राजकीय सामंजस्याचे जे दर्शन घडले, ते एकूणच राज्याच्या आजवरच्या सुसंस्कृत परंपरेला साजेसे, किंबहुना ही परंपरा आणखी पुढे नेणारे आहे. भाजप-शिवसेना युती सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या अधिवेशनातील काही दिवसच शिल्लक असताना विजय वडेट्टीवार आणि नीलम गो-हे यांची अनुक्रमे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आणि विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. वडेट्टीवारांना मिळालेले विरोधी पक्षनेतेपद औट घटकेपुरते असले तरी त्यांना ते देताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कटुता आली नाही हे चांगलेच झाले.


या दोन्ही पदांच्या निवडीचे काही नियम, संकेत असतात आणि ते पाळले जाणे क्रमप्राप्त असते. मात्र, हल्ली एकमेकांची कोंडी करण्याच्या हेतूने त्यातून चोरवाटा शोधून अशा निवडी होऊ न देण्याचा प्रघात पडलेला आहे. १९६१ च्या पावसाळी अधिवेशनात ‘तुमच्या सरकारचे मार्गदर्शक कोण?’ असा सवाल एका ज्येष्ठ सदस्याने सरकारला विचारला असता, त्यावर यशवंतराव चव्हाणांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक आणि दिशादर्शक आहे. ते म्हणाले होते की, ‘जनतेने निवडून दिलेले पण संख्याबळाअभावी विरोधी बाकावर बसलेले सन्माननीय सदस्य आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ हेच सरकारचे खरे मार्गदर्शक आहेत!’ सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये असलेला विरोधकांबद्दल असा आदरभाव हल्ली दुर्मीळ झाल्याचे दिसते. असो. राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात कोलांटउडी मारल्यामुळे विजय वडेट्टीवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली, तर दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या परिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोºहे बिनविरोध निवडून आल्या. हे पद तब्बल ५७ वर्षांनंतर महिलेला मिळाले आहे. अपघाताने वा अपरिहार्य कारणांस्तव वडेट्टीवारांना हे पद मिळाले असले तरी या पदाचे खरे दावेदार तेच होते.

काँग्रेस पक्षाने हे पद त्यांना यापूर्वीच द्यायला हवे होते. विद्यार्थी चळवळीतून राजकारणात आलेल्या वडेट्टीवारांचा मूळ पिंडच लढवय्या आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीसारख्या आडवाटेवर असलेल्या मतदारसंघातून ते निवडून आले असले तरी, त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष खूप मोठा आहे. आदिवासी, उपेक्षित आणि शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी ते सतत लढत आले आहेत. याच घटकांच्या बळावर त्यांनी ३८ वर्षे प्रस्थापितांच्या ताब्यात असलेला मतदारसंघ जिंकून घेतला आहे. खरे तर, काँग्रेस पक्षाने वडेट्टीवारांसारख्या लढवय्या नेत्याची प्रदेशाध्यक्षपदी निवड करायला हवी होती. कणखर नेतृत्वाअभावी विदर्भात जवळपास संपुष्टात आलेल्या काँग्रेस संघटनेला वडेट्टीवारांमुळे संजीवनी मिळाली असती. केवळ आठवडाभरापुरते विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याने कर्तृत्व दाखविण्याची संधीही त्यांना मिळणार नाही. निवडणुकीनंतरचे चित्र काय असेल, त्यावर आज भाष्य करणे अस्थायी ठरेल. जे वडेट्टीवारांचे झाले, तेच नीलम गोºहे यांच्याही वाट्याला आले. सामाजिक चळवळीतून आलेल्या नीलमतार्इंना खरे तर मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. उपेक्षित, शोषित आणि पीडित महिलांसाठी त्यांनी केलेला संघर्ष सर्वज्ञात आहे. प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन विकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेना सत्तेत सहभागी झाली तरी, विधान परिषदेत नीलमतार्इंनी उपस्थित केलेले प्रश्न सरकारला जाग आणणारे होते. उपसभापतीपद हे घटनात्मक असले तरी लोकसंपर्कासाठी ते केवळ शोभेचे पद आहे. या पदावर राहून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करता येईलच असे नाही. उलट, या पदाच्या जबाबदारीमुळे त्यांच्या कार्य झंझावातावर मर्यादाच येण्याचीच शक्यता अधिक. कोणाला कोणते पद द्यावे, हा त्या-त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण वडेट्टीवार असोत की नीलमताई, अशा संघर्षशील नेत्यांना ऐन उमेदीच्या काळात त्यांच्या योग्यतेचे पद मिळायला हवे. तोपर्यंत नव्या जबाबदारीबद्दल उभयतांचे अभिनंदन!
 

Web Title:  The choice of conflicting leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.