मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 12:24 PM2018-01-29T12:24:26+5:302018-01-29T14:02:50+5:30

धर्मा पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारला धारेवर धरलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दांत सुनावलं आहे

The Chief Minister should be ashamed after death of Dharma Patil says Supriya Sule | मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंचा संताप

मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंचा संताप

Next

मुंबई - जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री निधन झाले. धर्मा पाटील यांच्या निधनानंतर राज्य सरकारवर चौफेर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारला धारेवर धरलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दांत सुनावलं आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. 

सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली !. या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे'.


शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी गेल्या सोमवारी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आपल्याला न्याय मिळेपर्यंत आपण वडिलांचा मृतदेह हलवणार नाही असे धर्मा पाटील यांच्या मुलांनी सांगितले आहे.

धर्मा पाटील यांच्या पाच एकर जमिनीच्या मोबदल्यात केवळ चार लाखाचा मोबदला औष्णिक वीज प्रकल्पासाठी वीज निर्मिती करणाऱ्या यंत्रणेने देऊ केला. मात्र हा मोबदला योग्य नसल्यानं वीज प्रकल्पासाठी जमीन संपादित करणा-या यंत्रणेकडून दुजाभाव झाल्याचा आरोप करीत धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील ८० वर्षीय धर्मा पाटील यांनी गेल्या सोमवारी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. धर्मा पाटील यांच्या चार एकर शेतात ६००आंब्याची झाड लागवड केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शेतात विहीरदेखील आहे. या प्रकल्पासाठी ५२९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आलीय.

काय आहे प्रकरण -
सोमवारी एका 80 वर्षीय धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी गेली अनेक दिवस मंत्रालयात चकरा मारल्या पण तरीही योग्य  दाद मिळत नसल्याने हतबल धर्मा पाटील यांनी मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील असं या वृद्ध शेतकऱ्याचं नाव असून त्यांची प्रकृती सध्या गंभीर असल्याचं समजतं आहे. 

धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना फक्त चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये धर्मा पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. उपचार घेत असलेल्या धर्मा पाटील यांना धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल वगळता कुणीही भेटण्यासाठी गेलेलं नाही, किंवा त्यांची साधी विचारपूसही करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. तर दुसऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात आला आहे. योग्य मोबदल्यासाठी धर्मा पाटील गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे उंबरे झिजवत आहेत. मात्र त्यांना कुणीही प्रतिसाद देत नसल्याने हतबलतेतून त्यांनी अखेर स्वतःला संपवण्याच प्रयत्न केला. 
 

Web Title: The Chief Minister should be ashamed after death of Dharma Patil says Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.