पायाभूत सुविधांच्या बाबतीत मुंबई विमानतळ ठरले 'सर्वोत्तम'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 12:19 PM2019-02-20T12:19:19+5:302019-02-20T13:38:47+5:30

जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल (टी-2) पायाभूत सुविधांच्या बाबतीत 'सर्वोत्तम' ठरले आहे.

Chhatrapati Shivaji International Airport mumbai best infrastructure | पायाभूत सुविधांच्या बाबतीत मुंबई विमानतळ ठरले 'सर्वोत्तम'

पायाभूत सुविधांच्या बाबतीत मुंबई विमानतळ ठरले 'सर्वोत्तम'

ठळक मुद्देजगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल (टी-2) पायाभूत सुविधांच्या बाबतीत 'सर्वोत्तम' ठरले आहे.

मुंबई - जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल (टी-2) पायाभूत सुविधांच्या बाबतीत 'सर्वोत्तम' ठरले आहे. चार कोटी प्रवासी क्षमतेचे हे टर्मिनल असून देशातील विविध सार्वजनिक उपयोगांच्या प्रकल्पांमधील सर्वोत्तम बांधकाम ठरले आहे. नवी दिल्लीत झालेल्या 'ईपीएस वर्ल्ड' परिषदेत मुंबई विमानतळाला हा पुरस्कार मिळाला आहे.

जेट एअरवेज, एअर विस्तारा व एअर इंडिया या भारतीय विमानसेवा कंपन्यांसह विदेशी कंपन्यांची विमाने याच टर्मिनलमधून रवाना होत असतात. तासाला सरासरी 48 विमानांची ये-जा होत असते. 2006 पासून विमानतळाचा खासगीकरणातून विकास सुरू आहे. त्यासाठी जीव्हीके व विमानतळ प्राधिकरणाची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (मिआल) ही संयुक्त कंपनी स्थापन करण्यात आली आहे.  2014 मध्ये विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत बांधण्यात आले असून त्यामध्ये 98 अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहेत. 12 हजार कर्मचारी येथे कार्यरत असून चार कोटी प्रवासी क्षमतेचे हे टर्मिनल आहे. 

गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील अव्वल क्रमांकाचे विमानतळ ठरले होते. एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलने विमानतळाच्या सोई-सुविधेनुसार सर्वेक्षण केले होते. यामध्ये चेकइन, विमानतळावरील प्रवेश, सुरक्षा, प्रवाशांचे विश्रामगृह, प्रवाशांची खानपान व्यवस्था, प्रवासी सामान कक्ष या बाबींचा समावेश होता. या सर्व बाबींत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने अव्वल ठरत सर्वेक्षणामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. मुंबई आणि दिल्ली विमानतळाला विभागून हा क्रमांक देण्यात आला होता. तसेच मुंबई विमानतळ सर्वांत व्यस्त विमानतळ ठरले होते. 

मुंबई विमानतळाने काही दिवसांपूर्वी आपलाच विक्रम मोडीत काढला असून  24 तासांत तब्बल 1007 विमानांचे उड्डाण केले आहे. मागील विक्रम 1003 विमानोड्डाणांचा होता. यापूर्वी 3 फेब्रुवारी 2018 मध्ये मुंबई विमानतळावर 980 विमानांनी उड्डाण केले होते. तर 24 नोव्हेंबर, 2017 मध्ये 935 विमानांनी उड्डाण केले होते. मुंबई विमानतळाच्या दोन धावपट्ट्या आहेत. मात्र, त्या एकमेकांना छेदत असल्याने एकावेळी एकच विमान उड्डाण किंवा उतरू शकते. आजुबाजुला दाट वस्ती असल्याने आणि व्यस्त असल्याने नवीन धावपट्टी उभारणे अशक्य आहे. 1003 विमानउड्डानांचा विक्रम 5 जून, 2018 मध्ये करण्यात आला होता. 
 

Web Title: Chhatrapati Shivaji International Airport mumbai best infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.