Challenge the appointment of additional judges | अतिरिक्त न्यायाधीशांच्या नियुक्तीला आव्हान  

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नियुक्तीला एका वकिलाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
न्या. शिंदे जिल्हा न्यायाधीश असताना जनहितार्थासाठी त्यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली होती, तसेच त्यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करणा-या कॉलेजियमपुढे यापूर्वी दोनदा त्यांच्या नावाची शिफारस केली होती, परंतु दोन्ही वेळी ती फेटाळण्यात आली, असे व्यवसायाने वकील असलेले उल्हास नाईक यांनी याचिकेत म्हटले आहे. न्या. शिंदे यांची नियुक्ती रद्दबातल ठरवावी, अशी विनंती उल्हास नाईक यांनी याचिकेद्वारे केली आहे. १३ फेब्रुवारी २०१७ रोजी याचिकाकर्त्यांनी तत्कालीन सरन्यायाधीश जे. एस. केहर यांच्यापुढे प्रेझेंटेशन करून न्या. शिंदे यांच्या चौकशीची विनंती केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांच्यापुढेही प्रेझेंटेशन केले होते. तपास प्रलंबित असताना न्या. शिंदे यांची अनावधानाने उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती केल्याचेही याचिकेत म्हटले आहे.