CCTVs in all women's compartments in two months | सर्व महिला डब्यांमध्ये दोन महिन्यांत सीसीटीव्ही
सर्व महिला डब्यांमध्ये दोन महिन्यांत सीसीटीव्ही

मुंबई : उपनगरीय रेल्वेमार्गावरील तब्बल १० लाखांहून अधिक महिलांच्या सुरक्षेसाठी येत्या दोन महिन्यांत सर्व महिला डब्यांत सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. तसेच रेल्वे रुळांवरील अपघात रोखण्यासाठी पादचारी पुलांच्या कामांना प्राथमिकता देत ते पूर्ण करण्याच्या सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वेला देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे संसदीय समितीची बैठक मंगळवारी संपन्न झाली. या वेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
सीएसएमटी येथे झालेल्या बैठकीत संसदीय समितीसह खासदार राहुल शेवाळे, मध्य आणि पश्चिम रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. मुंबई उपनगरीय लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व महिला डब्यांत सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली. त्यानुसार रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची निविदा प्रसिद्ध झाली असून महिला महिला डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
मुंबई लोकलमध्ये ‘संवादयुक्त नियंत्रण यंत्रणा’ (कम्युनिकेशन बेस कंट्रोलिंग सिस्टिम-सीबीटीसी) बसविण्यास नीती आयोगाची मंजुरी मिळाली आहे. सीबीटीसी यंत्रणेमुळे दोन लोकलमधील अंतर हे ३०० मीटर असेल. सद्य:स्थितीत हे अंतर ८०० मीटर आहे. सीबीटीसीमुळे लोकल फेºयांची संख्या वाढेल.
कांदिवील-बोरीवली या रेल्व्े स्थानकांदरम्यान चव्हाण परिवारातील ४ तरुणांच्या अपमृत्यूचे पडसाद संसदीय समितीच्या बैठकीत उमटले. रेल्वे रुळांवरील अपघात रोखण्यासाठी पादचारी पुलांच्या कामाला प्राथमिकता देणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील बहुतांशी स्थानकांतील फलाट रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहितीही खासदार शेवाळे यांनी दिली.
>‘एसी लोकल’
हार्बर मार्गावर!
नवीन लोकल पश्चिम, मध्य मार्गांवर सर्वप्रथम धावते. लोकलचे आयुर्मान संपत आल्यावर ती हार्बर मार्गावर पाठवली जाते. रेल्वे प्रशासनाकडून हार्बर रेल्वेला मिळणाºया अशा ‘सावत्र’ वागणुकीबाबत बैठकीत विचारणा करण्यात आली. या वेळी चेन्नई इंटीग्रल कोच फॅक्टरी येथे वातानुकूलित लोकलची बांधणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेत येणारी वातानुकूलित लोकल सर्वप्रथम हार्बर मार्गावर धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
- राहुल शेवाळे,
खासदार
>२७६ कोटींचा येणार खर्च...
सद्य:स्थितीत मध्य रेल्वेच्या ताफ्यात १३१ लोकल (रेक) तर पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सुमारे १०० लोकल आहेत. मध्य रेल्वेच्या २० लोकलमध्ये सीसीटीव्ही कार्यरत आहेत. यापैकी १० लोकलमध्ये मध्य रेल्वेने महिला डब्यांत सीसीटीव्ही बसविले असून उर्वरित १० लोकलमध्ये आयसीएफतर्फे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेच्या १७ लोकलमधील महिला डब्यांत सीसीटीव्ही कार्यरत आहेत. सर्व महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी २७६ कोटींचा खर्च येणार आहे.


Web Title:  CCTVs in all women's compartments in two months
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.