Budget 2019: मुंबईकर गोयल यांचं मुंबईला गिफ्ट; ठाणे-दिवा, कळवा-ऐरोली, एसी लोकलचे प्रकल्प मार्गी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 05:20 AM2019-02-02T05:20:58+5:302019-02-02T05:21:28+5:30

रखडलेल्या योजनांना अर्थसंकल्पात निधी : विरार-डहाणू, कर्जत-पनवेल मार्गालाही मिळाला दिलासा

Budget 2019: Mumbaikar Goyal's gift to Mumbai; Thane-Diva, Kalwa-Airli, AC local project will be completed | Budget 2019: मुंबईकर गोयल यांचं मुंबईला गिफ्ट; ठाणे-दिवा, कळवा-ऐरोली, एसी लोकलचे प्रकल्प मार्गी

Budget 2019: मुंबईकर गोयल यांचं मुंबईला गिफ्ट; ठाणे-दिवा, कळवा-ऐरोली, एसी लोकलचे प्रकल्प मार्गी

Next

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) रेल्वे प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात ७४३.७० कोटींची तरतूद केल्याने अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. त्यात ठाणे-दिवादरम्यानचे दोन जादा मार्ग, कळवा-ऐरोली उड्डाणमार्ग, विरार-डहाणूदरम्यानचे चौपदरीकरण यांचा समावेश आहे.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला (एमआरव्हीसी) ५७८ कोटींची मिळणार असल्याने मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या (एमयूटीपी) टप्पा २, ३, ३ ए या प्रकल्पांसह इतर प्रकल्पांची कामे सुरू होतील. बेलापूर- सीवूड-उरण मार्गावर खारकोपरपर्यंत लोकल सुरू आहे. त्यापुढील मार्गाच्या कामासाठी १५३ कोटींची तरतूद आहे. महानगर क्षेत्रातील अन्य प्रकल्पांसाठी १२ कोटी देण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार आणि हार्बर रेल्वेवरील सीएसएमटी - पनवेल या उड्डाणमार्गांच्या कामासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला. इंटिग्रेटेड सुरक्षेसाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

एमयूटीपी टप्पा ३ ए मध्ये सीएसएमटी ते पनवेल उड्डाणमार्ग, पनवेल - विरार लोकलसाठी जादा मार्ग, हार्बर मार्गाचा गोरेगाव ते बोरीवली विस्तार, बोरीवली ते विरार पाचवी आणि सहावी मार्गिका, कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-बदलापूर मार्गाचे चौपदरीकरण, कल्याण यार्डाचे नूतनीकरण, २१० एसी लोकल, स्थानकांचा कायापालट आदी १३ प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी ५४ हजार ७७७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पण अर्थसंकल्पात अवघ्या ५० कोटींची तरतूद आहे. राज्य सरकार ५० कोटींचा निधी देणार आहे.
कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गासाठी १० कोटी, वसई रोड-दिवा- पनवेल मार्गावर स्वयंचलित सिग्नलसाठी एक कोटी, मध्य रेल्वेवरील एटीव्हीएमसाठी ४.१४ कोटी, मध्य रेल्वेमार्गालगत भिंतीसाठी १० कोटी; मरिनलाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, लोअर परळ, पादचारी पुलाच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी, ग्रँट रोड, महालक्ष्मी, माहिम, विलेपार्ले, जोगेश्वरी, बोरीवली, दहीसर, वसईतील पादचारी पुलांसाठी ५ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

एमयूटीपी टप्पा दोनसाठी २४४.९२ कोटी
एमयूटीपी टप्पा दोनसाठी २४४.९२ कोटी खर्च करून ठाणे-दिवादरम्यान पाचवा, सहावा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावा मार्ग तयार केला जाईल. एमयूटीपी टप्पा तीनसाठी २८३.७८ कोटी खर्चून पनवेल-कर्जत लोकलसाठी दोन मार्गिका, ऐरोली-कळवा उड्डाण रेल्वेमार्ग, चर्चगेट-विरार आणि सीएसएमटी-कल्याण १२ डब्यांच्या ४७ नव्या एसी लोकल, विरार-डहाणू चौपदरीकरणाचा समावेश आहे.

वांद्रे स्थानकातील कामे आणि वांद्रे टर्मिनसच्या हेरिटेज इमारतीच्या जतनासाठी ६ कोटी आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रूळ ओलांडू नये यासाठी भिंत उभारण्यासाठी २६ कोटी रुपये दिले जाणार आहेत.
उपनगरी मार्गावर ४२ नवे पादचारी पूल, विविध पुलांची दुरुस्ती आणि विस्तार, अंधेरी ते विरार मार्गावर धिम्या १५ डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार, पश्चिम रेल्वेमार्गावर ५५ सरकते जिने आणि १०० लिफ्टस् आदी प्रवासी सुविधांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: Budget 2019: Mumbaikar Goyal's gift to Mumbai; Thane-Diva, Kalwa-Airli, AC local project will be completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.