'Brother will do better than me' Somaiya's fake video viral | ‘भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल’ सोमय्यांचा खोटा व्हिडीओ व्हायरल
‘भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल’ सोमय्यांचा खोटा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : खासदार किरीट सोमय्या यांच्या ‘भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल’ या वाक्याचा गैरवापर करत एक व्हिडीओ तयार करून त्याचा वापर उत्तर पूर्व मुंबईतील आघाडीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी व्हायरल झाला आहे. या प्रकाराविरुद्ध सोमय्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत.
भाजपकडून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. त्यानंतर, सोमय्यांनी कोटक यांचा उल्लेख त्यांचा ‘लहान भाऊ’ असा करत ‘भाऊ माझ्यापेक्षा चांगले काम करेल’ असे ते बोलले होते.
तर आघाडीचे उमेदवार पाटील यांना या भागात भाऊ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सोमय्यांच्या याच वाक्याचा वापर या व्हिडीओत करण्यात आला आहे.
यात संजय पाटील यांची छायाचित्रे दिसतात आणि ‘भाऊ आला...’ असे म्हणत व्हिडीओ
तयार करण्यात आला आहे.
सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओचा वापर आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केला जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. अखेर, याविरुद्ध त्यांनी उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक अधिकारी विवेक गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे. तसेच संबंधित व्हिडीओदेखील त्यांना देण्यात आला आहे. या व्हिडीओच्या आधारे भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत.


Web Title: 'Brother will do better than me' Somaiya's fake video viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.