नवी मुंबई : विदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरु णांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार वाशी येथे घडला आहे. फँटाशिया मॉल येथे असलेल्या एक्स्पर्ट मॅनेजमेंट या कंपनीच्या माध्यमातून हा प्रकार घडला आहे. त्यानुसार फसवणूक झालेल्या तरुणांनी वाशी पोलीस ठाण्यात या कंपनीविरोधात तक्रार केली आहे. वाशी येथील फँटाशिया मॉलमध्ये एक्स्पर्ट मॅनेजमेंट नावाची कंपनी होती. या कंपनीने विदेशात नोकरी लावण्याचे आश्वासन अनेक तरु णांना दिले होते. त्याकरिता अनेक तरु णांनी ५० हजार रुपये ते अगदी ३ लाख रु पयांपर्यंतचे शुल्क या कंपनीत भरले होते. शिवाय आपले पासपोर्ट देखील कंपनीमध्ये जमा केलेले होते. त्यानुसार मंगळवारी काही तरु णांना नोकरीसाठी सिंगापूर येथे पाठवले जाणार होते. त्याकरिता काहींना सिंगापूरचा व्हिसा देण्यात आला होता. परंतु हा व्हिसा ट्युरिस्ट व्हिसा होता. त्यामुळे तरु णांनी कंपनीच्या व्यक्तींशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या तरुणांनी थेट वाशी येथील कंपनीचे कार्यालय गाठले. यावेळी एक्स्पर्ट कंपनीचे कार्यालय रिकामेच आढळून येताच आपली फसवणूक झाल्याचे समजल्याचे अमित शिंदे या तरुणाने सांगितले. आपल्याकडेही पैशांची मागणी करण्यात आली होती. मात्र आपण सध्या केवळ पासपोर्ट जमा केला होता असेही त्याने सांगितले. त्यानुसार एकत्रित झालेल्या सुमारे ४० तरु णांनी आज वाशी पोलिसांकडे फसवणुकीची तक्र ार केली. या प्रकारातून ३० लाख रु पयांहून अधिक आर्थिक फसवणुकीचा हा प्रकार उघड झाला आहे, तर ही रक्कम अधिक वाढण्याची शक्यता आहे. विदेशात नोकरीसाठी भोपाळ, आंध्रप्रदेश, हैद्राबाद, मध्यप्रदेश, नवी मुंबई येथील अनेक तरु णांनी एक्स्पर्ट मॅनेजमेंट या कंपनीत आपला पासपोर्ट जमा करून लाखो रु पये भरले. मात्र पैशासह तरुणांची महत्त्वपूर्ण कागदपत्रे व पासपोर्ट घेऊन कंपनीच्या संचालकांनी पळ काढला आहे. त्यानुसार या फसवणूक प्रकरणी वाशी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)