शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:21 AM2018-05-20T00:21:17+5:302018-05-20T00:21:17+5:30

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पुस्तके वाटप करण्याच्या शिक्षण सचिवांच्या सूचना

The books will be available on the first day of the school | शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके

शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके

मुंबई : उन्हाळी सुटी संपत आली असून विद्यार्थ्यांना आता शाळेचे वेध लागले आहेत. यंदा येत्या १८ जूनपासून शाळा सुरू होत असल्या तरी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पुस्तके पडणार आहेत. राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळांमधील मुलांच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी यंदाच्या शैक्षणिक सत्राच्या प्रारंभालाच इयत्ता १ ते ८ वी पर्यंतच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहे. याविषयीचे निर्देश गुरूवारी शिक्षण सचिव नंदकुमार यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत मोफत पाठयपुस्तकांसाठी केंद्राकडून तरतुदीसाठी तत्वत: मंजुरी मिळाली आहे.
मोफत पाठयपुस्तका संदर्भात करावयाच्या कार्यवाहीचे परिपत्रक शिक्षण सचिव नंदकुमार यमाई जरी केले असून येत्या शैक्षणिक सत्रात प्राथमिकस्तरावर प्रतिविद्यार्थी २५० रुपए व माध्यमिक स्तर प्रतिविद्यार्थी ४०० रुपए या दराने ही तरतूद तत्त्वत: मंजूर करण्यात आले असल्याचे त्यात म्हटले आहे. येत्या सत्रासाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगू व सिंधी अरेबी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे यापूर्वीच नोंदविण्यात आलेली आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांद्वारा पुस्तकांची खरेदी करण्याची शक्यता लक्षात घेता सर्व व पालक व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी शाळेच्या दर्शनी भागावर याविषयीचे फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुकास्तरावर पुस्तके आल्यानंतर तत्काळ माध्यम, इयत्ता व विषयनिहाय संच वर्गीकरण करावेत व विनाविलंब संबंधित शाळांना पाठविण्यात यावेत.
पुस्तके तालुकास्तरावर आल्यावर गटसमन्वयकाचा प्रभार असलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी कार्यालय सोडू नये, अशी तंबी शिक्षण सचिवांनी दिली आहे.

शाळेचा पहिलाच दिवस पुस्तक दिवस
राज्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक दिवस साजरा करण्याची कार्यवाही करण्यात यावी आणि मुख्याध्यापकांकडून पुस्तकांचे वाटप करण्यात यावे असे निर्देश शिक्षण सचिवांनी दिले आहेत. या समारंभाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ व संस्थेच्या पदाधिकाºयांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. पहिल्या दिवशी जे विद्यार्थी येतील त्यांना व जे अनुपस्थित आहेत, त्या विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर पुस्तके वितरित करावे व निकषपात्र शाळांमध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्यास शिल्लक राहिलेल्या पाठ्यपुस्तकांमधून वितरित करण्यात यावे असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: The books will be available on the first day of the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.