मुंबई, दि. 14 - 'ब्लू व्हेल' गेम प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने इथे मुलांचे जीव जात आहेत आणि आपण याबाबत अजिबात गंभीर दिसत नाही अशा शब्दांत फेसबूक, गुगलला फटकारलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एका आठवड्यात प्रतिज्ञापत्रात सादर करण्याचा आदेशही दिला आहे. जीवघेणा ऑनलाइन गेम द ब्लू व्हेलविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 'सिटीझन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर अ‍ॅण्ड एज्युकेशन' या एनजीओच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी या याचिकेत गुगल, फेसबुक, याहू यांच्यासह मुंबई पोलिसांच्या सायबर सेललाही प्रतिवादी बनवले आहे. 

नोटीस मिळाल्यानंतर फेसबुक आणि गुगलने उत्तर देण्यासाठी वेळ मागून घेतली होती. यासंबंधी बोलताना मुंबई उच्च न्यायालयाने फेसबुक आणि गुगलला चांगलंच फटकारलं. 'इथे मुलांचे जीव जात आहेत आणि आपण याबाबत अजिबात गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर आपलं उत्तर सादर करा', असा आदेशच मुंबई उच्च न्यायालायने दिला आहे. 

गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने आपली मुलं कुठे जातात? काय करतात? यावर लक्ष ठेवणे पालकांची जबाबदारी नाही का? प्रत्येक गोष्टीत सरकारने आणि न्यायालयानेच काहीतरी करावे, अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असं म्हटलं होतं. 

ब्लू व्हेल गेममध्ये शेवटच्या टप्प्यावर खेळणा-याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाते. तसे करण्यासाठी त्याला प्रसंगी धमकीही दिली जाते. महाराष्ट्रात दोन जणांनी या गेममुळे आत्महत्या केली. तर देशभरातही काही आमहत्या झाल्या. त्यामुळे ११ ऑगस्टला केंद्र सरकारने या गेमवर बंदी टाकण्यासंबंधी परिपत्रक काढले. या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात आली की नाही, याबाबत सायबर सेलकडे चौकशी करावी, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली होती. हा गेम तत्काळ बंद करावा, अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. तसेच सरकारने या गेमशी संबंधित तक्रारी आणि समस्यांसाठी एक हेल्पलाइन सुरू करावी. जेणेकरून या गेमच्या आहारी जाणारी लहान मुले तसेच त्यांच्या पालकांना या संदर्भात मदत करता येईल, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

काय असते ब्ल्यू व्हेल चॅलेंज?
ब्लू व्हेल हा व्हिडीओ गेम असून २0१३ साली रशियात त्याची सुरुवात झाली. तो खेळणा-याला 50 आव्हाने (चॅलेंजेस) दिली जातात. आव्हाने ५0 दिवसांत पूर्ण करायची असतात. आधी सोपी व नंतर नंतर कठीण आव्हाने दिली जातात. त्यात हाताच्या नसा कापणे, जनावराला मारणे व अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगणे आदींचा समावेश असतो. प्रत्येक आव्हान पूर्ण केल्यानंतर ते चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवायचे असते. अखेर सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.