BJP's support for the Legislative Council, BJP's Madhav Bhandari nomination? | विधान परिषदेसाठी सेनेचा भाजपाला पाठिंबा, भाजपातर्फे माधव भंडारी यांना उमेदवारी?

मुंबई : विधान परिषदेच्या ७ डिसेंबरला होण-या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिला. मात्र, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे उमेदवार नसतील, अशी अट घातली. रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपच्या बैठकीत पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा घेण्याकरता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गळ घातली. राणे हे आमचे उमेदवार नसतील, असे स्पष्ट केले. त्यावर, उद्धव यांनी भाजपाला पाठिंबा देण्याचे सूतोवाच केले, असे सूत्रांनी सांगितले.
भाजपाचे १२२ तर शिवसेनेचे ६३ असे मिळून १८५ आमदार आहेत. त्यामुळे युतीचा उमेदवार सहज विजयी होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या एकदोन दिवसांत चर्चा करुन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करतील, असे म्हटले जाते. शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिल्याच्या वृत्ताला दोन्ही बाजूंनी अधिकृत दुजोरा दिला नाही. ‘राजकीय चर्चेसाठी आम्ही भेटलो नाही. खड्डेमुक्त रस्ते अभियानाची मी ठाकरे यांना माहिती दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र, सूत्रांनी सांगितले की आजची भेट ही विधान परिषदेसाठी पाठिंबा मिळविण्यासाठीच होती.
>मुख्यमंत्र्यांनी मागितला पवारांकडे पाठिंबा
मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुरुवारी रात्री बैठक झाली. तीत मुंबई क्रिकेट असोसिएशन, साखर प्रश्न हे विषय होते. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. उमेदवार पाहून पाठिंब्याचा विचार करू, या शब्दात पवार यांनी अनुकूलता दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.