'मिशन पालघर'साठी भाजपाचा 'नेहले पे देहला'; मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 05:37 PM2018-05-10T17:37:57+5:302018-05-10T17:46:34+5:30

मुंबई महापालिकेच्या गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

BJP plays new game sent notice to 6 corporator who goes into Shivsena from MNS | 'मिशन पालघर'साठी भाजपाचा 'नेहले पे देहला'; मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांना नोटीस

'मिशन पालघर'साठी भाजपाचा 'नेहले पे देहला'; मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांना नोटीस

googlenewsNext

मुंबई: पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून भाजपा आणि शिवसेना यांच्याती संघर्ष आणखीनच तीव्र झाला आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पूत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने आपल्या गळाला लावल्यानंतर आता भाजपाने थेट सेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई महानगरपालिकेत अस्थिरता निर्माण करण्यासाठी डाव टाकला आहे. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेने मनसेचे 6 नगरसेवक फोडले होते. संतापलेल्या मनसेने याविरोधात कोकण आयुक्तांकडे धाव घेत या नगरसेवकांचा शिवसेनेतील प्रवेश अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. त्यावर अद्यापपर्यंत सुनावणी होऊ शकली नव्हती. मात्र, आता पालघरमधील पोटनिवडणुकीत शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन आव्हान निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी कोकण आयुक्तांकडून या सहा नगरसेवकांना नोटीस पाठवण्यात आली. त्यानुसार या सहा नगरसेवकांना 14 मे रोजी कोकण आयुक्तांपुढे स्पष्टीकरण देण्यासाठी हजर राहावे लागणार आहे. योगायोग म्हणजे पालघर पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीचा हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजपाने शिवसेनेवर दबाव निर्माण करण्यासाठी नगरसेवकांचे हे प्रकरण उकरून काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जेणेकरून शिवसेना पालघरच्या पोटनिवणुकीतून माघार घेईल, असा राजकीय तज्ज्ञांचा होरा आहे.

रत्नागिरी नगरपालिकेत झालेल्या अशाच एका प्रकरणात तीन महिन्यांत कोकण आयुक्तांची मंजुरी न मिळाल्यास मंजुरी मिळाली, असे गृहीत धरावे असा निकाल न्यायालयाने दिला होता. मुंबई महापालिकेच्या गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या मनसेच्या सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. दिलीप लांडे, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी माटेकर, हर्षला मोरे आणि दत्तात्रय नरवणकर असे सहा नगरसेवक सेनेत दाखल झाल्याने सेनेचे पालिकेतील संख्याबळ ९६वर पोहोचले. तसे पत्रही शिवसेनेकडून कोकण आयुक्तांना सादर करण्यात आले. मात्र, मनसेने या पत्राला मंजुरी न देण्याची मागणी करत कोकण आयुक्तांकडे धाव घेतल्याने सेनेचे मनोरथ अद्याप पूर्ण झालेले नाही. 


 

Web Title: BJP plays new game sent notice to 6 corporator who goes into Shivsena from MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.