Bhide's mango statement directly in the high court | भिडेंचे आंबा वक्तव्य थेट हायकोर्टात

मुंबई - शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे सार्वजनिक सभेत सतत वादग्रस्त विधाने करत असल्याने त्यांना सार्वजनिक सभेत भाग घेण्यास मनाई करावी. तसेच त्यांना पत्रकार परिषदही घेऊ देऊ नये, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात गुरुवारी दाखल करण्यात आली आहे.
संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये १० जूनला घेतलेल्या सार्वजनिक सभेत त्यांच्या बागेतील आंबे खाऊन निपुत्रिकांना मुले होतात, असा दावा केला. अशास्त्रीय विधान करून भिडे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केले आणि तशी तक्रारही गणेश सुरेश बोºहाडे यांनी कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे केली. मात्र, भिडे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला नाही. नाशिक पालिकेने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. परंतु, त्यांनी ती स्वीकारली नाही. एकंंदरीतरच नाशिक पालिका, कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त संचालक, आरोग्य विभागाचे संचालक यांनी भिडेंवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी विनंती करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी न्यायालयात केली.
भिडे यांनी अलीकडेच संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ असल्याचे विधान करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. भिडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत असल्याने त्यांच्यावर घटनेचे अनुच्छेद १९ (२) (३) (४) (५) नुसार बंधने घालावीत. ते व त्यांच्या संस्थेच्या सदस्यांना जाहीर सभेत भाग घेण्यास व बोलण्यास, पत्रकार परिषद घेण्यासही बंदी घालावी, अशी अंतरिम मागणी भालेराव यांनी याचिकेद्वारे केली आहे.
 


Web Title: Bhide's mango statement directly in the high court
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.