BEST Strike : बघतो, बोलतो... मदत मागायल्या गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंचं मोघम आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 12:23 PM2019-01-10T12:23:46+5:302019-01-10T13:35:55+5:30

BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उडी घेतली आहे. मनसेनं बुधवारी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर,संपकरी कर्मचारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर पोहोचले आहेत.

BEST Strike : Best employees meeting with MNS Chief Raj Thackeray over strike issue | BEST Strike : बघतो, बोलतो... मदत मागायल्या गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंचं मोघम आश्वासन

BEST Strike : बघतो, बोलतो... मदत मागायल्या गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना राज ठाकरेंचं मोघम आश्वासन

ठळक मुद्देसंपकरी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलीबेस्ट कर्मचाऱ्यांनी लेखी स्वरुपात मांडल्या समस्यातुम्ही सगळ्यांनी एकत्र राहा, राज ठाकरेंचा सल्ला

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उडी घेतली आहे. मनसेनं बुधवारी (9जानेवारी) बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर, संपकरी कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली. बेस्ट कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंकडे लिखित स्वरुपात आपल्या मागण्या मांडल्या. बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयदेखील यावेळेस उपस्थित होते.

'कामावर या अन्यथा घरं सोडा', अशी नोटीस देण्यात आली असून बळजबरीने घरं सोडण्याच्या कागदपत्रांवर सही करुन घेतल्याचा आरोपही बेस्ट कामगारांच्या पत्नींनी केला आहे.

पण, या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी 'बघतो, बोलतो' असं सांगत मदत मागायल्या गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांना मोघम आश्वासन दिले आहे. तसेच, काहीही झाले तरी एकजूट राहा, असा सल्लाही राज ठाकरेंनी कर्मचाऱ्यांना दिला.


एकीकडे राज ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर केलेला असताना, दुसरीकडे शिवसेनेनं संपाला दिलेला नैतिक पाठिंबा मंगळवारी (8 जानेवारी) काढून घेतला. शिवसेनेने संपातून माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या संघटनेतील काही पदाधिका-यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. स्वपक्षीय संघटनेतच फूट पडल्यामुळे शिवसेनेची नाचक्की झाली आहे. संपाला दिलेला पाठिंबा शिवसेनेनं काढून घेतला असला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्ट संपाच्या वादात उडी घेतली आहे. बेस्टच्या तिढ्याप्रश्नी उद्धव ठाकरे आता स्वत: मध्यस्थी करणार आहेत. आज दुपारी महापौर, बेस्ट समिती अध्यक्ष आणि आयुक्तांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काय तोडगा काढण्यात येणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बेस्ट संपाचा तिसरा दिवस

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. बेस्ट प्रशासनाने मेस्मांतर्गत कारवाई तसेच कामगार वसाहती खाली करण्यास सुरुवात केली आहे. कामगार संघटना ठाम राहिल्यामुळे संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. परिणामी, मुंबईकरांचे सलग तिसऱ्या दिवशीही हाल सुरू आहेत. कारवाईमुळे बेस्ट कर्मचारी अधिक आक्रमक झाले आहे. बेस्ट उपक्रम ही अत्यावश्यक सेवा असल्याने प्रशासनाने औद्योगिक न्यायालयातून संपावर बंदी आणून हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुळे तीनशे कामगारांवर मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस तसेच भोईवाडा, परळ, वडाळा, कैलास पर्वत येथील बेस्ट वसाहतीतील दोन हजार कामगारांकडून घरे खाली करून घेण्यास सुरुवात झाली. या कारवाईला कामगारांनी विरोध केल्याने संप चिघळला आहे. 

वेतन करार, बोनस, बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण या मुद्द्यांवर बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीने सोमवारी (7 जानेवारी) मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. 

या मागण्यांसाठी संप

1. महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे 2016-2017, 2017-2018 या काळातील सानुग्रह अनुदान मिळणे
2.एप्रिल 2016पासून लागू होणाऱ्या वेतन कराराच्या तातडीने वाटाघाटी
3. अनुकंपा तत्त्वावर तातडीने भरती
4. बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा महापालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावावर अंमल
5. कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवणे

बेस्टचे सहा कोटींचे नुकसान

बेस्ट उपक्रमाला दररोज प्रवासी भाड्यातून तीन कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र गेल्या दोन दिवसांत एकही बस आगाराबाहेर न पडल्यामुळे बेस्ट उपक्रमाचा दोन दिवसांचा महसूल बुडाला. बुधवारी (9 जानेवारी) वडाळा, वरळी, वांद्रे आगारातील ११ बसगाड्या सकाळी बस आगाराबाहेर पडल्या. मात्र या बसगाड्याही काही तासांनी बस आगारांमध्ये परतल्या.

Web Title: BEST Strike : Best employees meeting with MNS Chief Raj Thackeray over strike issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.