The beginning of the election process of the University's Legislative Assembly and the Study Board | विद्यापीठाच्या अधिसभा व अभ्यास मंडळाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात

मुंबई : मुंबई विद्यापीठाने अधिसभेच्या व अभ्यास मंडळाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात केली असून याची अधिसूचना मंगळवार  दिनांक  २ डिसेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध होत आहे. यादिवशी अधिसभेवर प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी,विद्यापीठ अध्यापक आशा तीन घटकांच्या व अभ्यास मंडळासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख या घटकाच्या निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपातील मतदार यादी मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाणार आहे. तसेच ती यादी अवलोकनार्थ मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कार्यालयातही उपलब्ध आहे.

ज्यांना या मतदार यादीत आक्षेप असल्यास त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक कुलसचिव यांच्याकडे दिनांक ६ डिसेंबर २०१७ 
पर्यंत नमुना ए नुसार  सादर करावेत

या अधिसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी,विद्यापीठ अध्यापक व  अभ्यास मंडळासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख अशा चार घटकांच्या  प्रतिनिधींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत तर दुसऱ्या टप्प्यात शिक्षक व  नोंदणीकृत पदवीधर घटकांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात अधिसभेवर जाण्यासाठी १९ जागा व अभ्यास मंडळावर जाण्यासाठी ३ अशा एकूण २२ जागा असतील.

निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-

       तपशील    | अंतिम दिनांक व वेळ

१. तात्पुरती मतदार यादी : २/१२/२०१७
२. आक्षेप : ६/१२/२०१७ सायंकाळी ५ पर्यंत
३. दुरुस्त मतदार यादी : ९ /१२/२०१७
४. कुलगुरूंकडे अपील : १३/१२/२०१७ सायंकाळी ५ पर्यंत
 

 निवडणुकीचे घटक व जागा 
  घटक                            जागा

1. प्राचार्य                                    १०
2. संस्था प्रतिनिधी                          ६
3. विद्यापीठ अध्यापक                    ३
4. महाविद्यालयातील विभाग प्रमुख   ३
                                एकूण जागा  : २२

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार यावेळेस प्रथमच महाराष्ट्रातील विद्यापीठात अधिसभा व अभ्यास मंडळाच्या निवडणुका होत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या या निवडणुका यशस्वीरित्या होतील याचा मला विश्वास आहे. या निवडणुका यशस्वीरित्या होण्यासाठी येथील सर्व घटक विद्यापीठास मदत करतील याचा मला सार्थ विश्वास वाटतो.

 - डॉ. देवानंद शिंदे ,  कुलगुरू,  मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा व अभ्यास मंडळाच्या निवडणुकीसाठी विद्यापीठ सज्ज असून याची सर्व तयारी विद्यापीठाने केली आहे. याचाच एक पहिला टप्पा म्हणून प्रशासनाने तयार केलेली तात्पुरती मतदार यादी आम्ही जाहीर करीत आहोत.पहिल्या टप्प्यातील ही मतदार यादी संबंधित घटकांनी पहावी व जे आक्षेप असतील ते निर्धारित वेळेत प्रशासनाकडे द्यावेत ही विनंती.

- डॉ. दिनेश कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव, मुंबई विद्यापीठ