Beginning of bright future through education in the lives of the oppressed ... | वंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याचा आरंभ...
वंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भवितव्याचा आरंभ...

- नामदेव मोरे

श्रीमंती केवळ पैशांची असून चालत नाही. ती मनाचीही हवी. मनाने श्रीमंत माणूसच इतरांचे भविष्य घडविण्यासाठी स्वत:चे वर्तमान पणाला लावतो आणि यातूनच ‘आरंभ’ होतो तो एका नव्या उज्ज्वल भवितव्याचा! वंचितांच्या आयुष्यात शिक्षणाच्या माध्यमातून अशाच उज्ज्वल भवितव्याचा आरंभ केला तो शोभा मूर्ती यांनी!

देशातील प्रमुख उद्योग समूहात चार्टर्ड अकाउंटंट ते सामाजिक कार्यकर्त्या हा शोभा मूर्ती यांचा प्रवास कौतुकास्पद. पण तो सरळसोपा नाही. वडील बीआरसीत वैज्ञानिक तर भाऊ अमेरिकेत बड्या कंपनीत उच्च पदावर. शोभा मूर्तीही टाटा उद्योग समूहात चांगल्या पदावर कार्यरत होत्या. पैसा, प्रतिष्ठा सर्व होते. परंतु या सुखवस्तू आयुष्यात मन रमत नव्हते. मदर तेरेसा, बाबा आमटे यांच्या कार्याचा मनावर कोरला गेलेला प्रभाव स्वस्थ बसू देत नव्हता. याच अस्वस्थतेतून एक तप कॉर्पोरेट क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी तुर्भे स्टोअर्समधील रेड लाइट एरियात १९९७मध्ये झोपडट्टीत राहणाऱ्या, कचरावेचक, सिग्नलवर भीक मागणाºया, मजुरी करणाºया शाळाबाह्य मुलांसाठी ‘आरंभ’ संस्था सुरू केली. आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचे दान वंचितांना देऊन त्यांचे भवविश्व समृद्ध व्हावे, हाच यामागील हेतू होता. पण म्हणतात ना, हेतू प्रामाणिक असला तरी मार्गात आडकाठी आणणारे अनेक असतात. शोभा मूर्ती यांच्या कार्यातही असे अडथळे आलेच.
कमी पैशांत राबणारी मुले हातची गेल्याने, इंग्रजीत शिकू लागल्याने समाजकंटकांनी कार्यालय जाळण्याच्या धमक्या दिल्या. परिसर सोडण्यासाठी दबाव निर्माण केला; परंतु कुणालाही न जुमानता या वात्सल्य‘मूर्ती’ने ज्ञानयज्ञ अखंड सुरूच ठेवला. त्यामुळेच आजमितीस संस्थेतील अनेक मुले दुबईपासून ते मुंबईतील कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये उच्च पदावर आहेत.
या मुलांप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये शिक्षण व ग्रामीण महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्या झटत आहेत.
ज्ञानदान, समाजसेवेच्या ध्यासातून भारावलेल्या दोन दशकांच्या वाटचालीविषयी मूर्ती सांगतात, लग्न न करण्याचा माझा निर्णय आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील सोडलेली नोकरी यामुळे आईवडिलांना माझी चिंता होती; परंतु नंतर ‘आरंभ’च्या माध्यमातील माझे काम पाहून त्यांना माझा अभिमान वाटू लागला. या वाटचालीत मदत करणाºया अनेकांचे आभार. भविष्यात निराधार वृद्धांना मोफत सांभाळणारे केंद्र सुरू करायचे आहे. सर्वांच्या प्रेमळ साथीने याही कार्याचा लवकरच ‘आरंभ’ होईल.

पाच हजारांपेक्षा जास्त मुलांना शिक्षण देता आल्याचा आनंद आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने समाजाचे देणे फेडले पाहिजे. हेच देणे फेडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहे, याचे समाधान आहे; आणि तेच माझ्यासाठी पैशांपेक्षाही लाखमोलाचे आहे.


Web Title: Beginning of bright future through education in the lives of the oppressed ...
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.