महाराष्ट्र बंद अखेर मागे, काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत -  प्रकाश आंबेडकर 

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 4:19pm

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. 

मुंबई : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.  महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, भीमा कोरेगाव घटनेतील मुख्य सूत्रधार शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आहेत. जो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना लावा. तसेच, त्या दोघांना सरकारने अटक करावी, अशी मागणी केली. याचबरोबर काही हिंदू संघटना अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. महाराष्ट्र बंद मागे घेत असून राज्यातील 50 टक्के जनता आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाली होती. आजचा बंद शांततेत पार पडला. तसेच, आजचा संप फक्त दलित बांधवाचा नव्हता, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. या बंदला समविचारी आणि डाव्या संघटनांचा पाठिंबा मिळाला. दोन-तीन घटनांचा अपवाद वगळता हा बंद शांततेत पार पडला, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. याचबरोबर,भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला 200 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अभिवादन करण्यासाठी त्याठिकाणी अनुयायी गेले होते. दरम्यान, भीमा कोरेगावमधील कार्यक्रम ही सभा नव्हती. काही जण विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद आणि  जिग्नेश मेवानी यांची नावे घेतली जात आहेत, पण त्यांचा याच्याशी संबंध नाही, असेही  प्रकाश आंबेडकर यांना यावेळी स्पष्ट केले. तसेच, महाराष्ट्र बंद दरम्यान काही हिंसक घटना घडल्या, त्याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, जोपर्यंत माझ्या हातात होते तोपर्यंत मी आंदोलन शांत ठेवण्याचे काम केले. महाराष्ट्र बंदमध्ये अनेक संघटना सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे आता यापुढे सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. 

दरम्यान, पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदने राज्यातील अनेक भागात हिंसक वळण घेतले.  मुंबईत सुद्धा काही ठिकठिकाणी हिंसक आंदोलने झाली. मुंबईतील कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर आज दुपारी आंदोलकांनी मोठया प्रमाणात तोडफोड केली. रेल्वे स्टेशनवरील स्टीलच्या खुर्च्या तोडून ट्रॅकवर फेकण्यात आल्या होत्या. तसेच, स्टीलच्या खुर्च्या आणि टयुबलाईट वॉटरवेंडिग मशीनची तोडफोड केली. स्थानक परिसरातील जाहीरात बोर्डाचे फलकही फाडण्यात आले होते. दुसरीकडे, कोल्हापूरात कडकडीत बंद पाळण्यात येत असला तरी या ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले. महाद्वार रोडवर हिंदुत्ववादी कार्यकर्तेही समर्थनार्थ उतरले आणि रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. गुजरीमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या संरक्षणासाठी कडे केले. तथापि आंदोलकांचा संताप अनावर झालेला होता. दरम्यान, राज्यभरातील अनेक जिल्ह्यात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असला तरी अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

संबंधित

सवर्णांचे आरक्षणही फसवे - प्रकाश आंबेडकर
‘महाराष्ट्राची सत्ता सामान्य मराठ्यांची नसून १६९ घराण्यांच्या हातात आहे’-प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर-विनायक मेटे भेटीचे संकेत काय..?
दहा टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार नाही - प्रकाश आंबेडकर
सांगली : प्रकाश आंबेडकर हे केवळ नावाचेच वारसदार : मधुकर कांबळे

मुंबई कडून आणखी

रेल्वे ट्रॅक, रस्त्यांखालील कल्व्हर्टच्या सफाईसाठी रोबो
मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ पुरस्कारांचे आज वितरण
‘त्या’ मुलींच्या पळण्यामागचे गूढ कायम...
खरं नाही वाटत, माझा पुत मला सोडून गेला!
न्यायालयाच्या इमारतीसाठी जागा देण्यास विलंब

आणखी वाचा