'Babasaheb wants to create a state of equality' | ‘बाबासाहेबांना अभिप्रेत समतेचे राज्य निर्माण करू’
‘बाबासाहेबांना अभिप्रेत समतेचे राज्य निर्माण करू’

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानवाच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले समतेचे राज्य निर्माण करू, असे प्रतिपादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल विद्यासागर राव यांनीही चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण केले. शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदींनी बाबासाहेबांना पुष्प अर्पण केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समतेचे राज्य निर्माण करू. त्यांचे विचार, संविधानानेच भारत जगातील सर्वोत्तम देश बनू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘क्रांतिसूर्याला विनम्र अभिवादन’ या ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे या वेळी प्रकाशन झाले. तर, विधान भवनाच्या प्रांगणातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी अभिवादन केले.


Web Title: 'Babasaheb wants to create a state of equality'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.