Aurangabad's garbage question finally ended, Aditya Thackeray intervened | औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर अखेर निघाला तोडगा, आदित्य ठाकरेंनी केली मध्यस्थी
औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर अखेर निघाला तोडगा, आदित्य ठाकरेंनी केली मध्यस्थी

मुंबई- औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता का होईना अखेर तोडगा निघाला आहे. तात्पुरत्या स्वरूपात खदान परिसरात कचरा टाकण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत. औरंगाबादमध्ये पेटलेल्या कचरा प्रश्नावर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी खदान परिसरात कचरा टाकण्याचे आदेश दिल्याची माहिती सेनेच्या मंत्र्यांना दिली.

कचर्‍याचा प्रश्नाने आज हिंसक वळण घेतले होते. नारेगाव येथे कचराकोंडी झाल्याने मनपातर्फे तात्पुरत्या स्वरुपात मिटमिट येथे कचरा टाकण्यात येणार होता. याला विरोध करत जमावाने कचरा टाकण्यात आलेल्या दोन गाड्यांवर दगडफेक करत त्या पेटवून दिल्या होत्या. शहरातील कचराकोंडीचा आजचा 20वा दिवस आहे. शहरात सध्या साचलेल्या कचर्‍याच्या व्यवस्थापनासाठी मिटमिटा येथे तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. येथील सफारी पार्कसाठी राखीव 100 एकर जागेपैकी 5 एकर जागा शासनाने (जिल्हाधिकार्‍यांनी) महापालिकेला दिली आहे.

आज या ठिकाणाची पाहणी करण्यास गेलेल्या मनपाच्या पथकाला स्थानिक नागरिकांनी अडवले होते. त्यानंतर 3.30च्या दरम्यान मनपाच्या कचरा गाड्या पोलीस बंदोबस्तात येथे दाखल झाल्या. यावेळी कचरा टाकण्यास विरोध करणारा जमाव हिंसक झाला व त्यांनी दगडफेक करत दोन गाड्या पेटवून दिल्या. जमावास पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे.


Web Title: Aurangabad's garbage question finally ended, Aditya Thackeray intervened
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.