अबब! म्हाडाने पाठवली एक लाखाची बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:01 AM2018-02-08T02:01:21+5:302018-02-08T02:01:29+5:30

कॉटनग्रीन पश्चिमेला असलेल्या काळाचौकी येथील अभ्युदयनगरमधील म्हाडाच्या वसाहतीमध्ये राहणाºया गाळेधारकांना प्रशासनाने सेवाशुल्काच्या नावावर प्रत्येकी १ लाख रुपयांहून अधिक रकमेची थकबाकी पाठविली आहे.

Aub! A lacquer bill sent by MHADA | अबब! म्हाडाने पाठवली एक लाखाची बिले

अबब! म्हाडाने पाठवली एक लाखाची बिले

Next

- चेतन ननावरे 
मुंबई : कॉटनग्रीन पश्चिमेला असलेल्या काळाचौकी येथील अभ्युदयनगरमधील म्हाडाच्या वसाहतीमध्ये राहणाºया गाळेधारकांना प्रशासनाने सेवाशुल्काच्या नावावर प्रत्येकी १ लाख रुपयांहून अधिक रकमेची थकबाकी पाठविली आहे. १९९८ सालापासूनची ही थकबाकी पाठविताना रहिवाशांच्या सेवाशुल्कात म्हाडाने तब्बल ८६० पटीने वाढ केल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
इमारत क्रमांक - २७ मधील स्वस्तिक सोसायटीचे अध्यक्ष दिलीप नारकर यांनी सांगितले की, म्हाडाने २००२ साली अशाच प्रकारे सेवाशुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळीही म्हाडाने १९९८ सालापासून शुल्कवाढ लागू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, रहिवाशांनी कडाडून विरोध केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, विरोधी पक्षनेते, विधानसभा सदस्य व इतर लोकप्रतिनिधींनी एक बैठक घेतली. त्या बैठकीत महानगरपालिकेचा म्हाडाकडून वसूल केला जाणारा दर आणि म्हाडाचा सेवा आकार यामध्ये ५० टक्के कपात करण्याचे आदेश दिले, तसेच नवा निर्णय होईपर्यंत जुन्याच दराने करवसुली करण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे, ३१ डिसेंबर २००३ सालापासून सर्व मिळकत व्यवस्थापन १९९८ सालच्या दराने सेवाशुल्क आकारत आहेत. त्या वेळी म्हाडाने सेवाशुल्कात कपात केली असली, तरी मनपाने शुल्कातील वाढ सुरूच ठेवल्याने ही तफावत निर्माण झाली.
मात्र, याबाबत रहिवाशांना आजपर्यंत कोणतीही माहिती किंवा नोटीस न देता, आज अचानक १९ वर्षांनंतर जागे झालेल्या म्हाडा प्रशासनाने दंड आणि व्याजासहित १ लाख रुपयांहून अधिक रकमेची बिले रहिवाशांना धाडली आहेत. त्यामुळे रहिवाशांनी पुन्हा एकदा आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक रहिवाशी रवींद्र कामतेकर यांनी सांगितले की, अभ्युदयनगरमधील सर्व इमारतींनी मिळून प्रशासनासोबत चर्चा करण्यासाठी ‘अभ्युदयनगर सहकारी गृहनिर्माण संस्थांचा संघ’ स्थापन केला आहे. २००२ सालापासून २०१२ सालापर्यंत या संदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचे पाहून, खुद्द संघानेच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, २०१३ सालापर्यंत या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. त्यानंतर, मंत्रालयाला २१ जून २०१२ रोजी लागलेल्या आगीत या संदर्भातील कागदपत्रे भस्मसात झाली, तशी कबुलीही तत्कालीन गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी २९ नोव्हेंबर २०१३ साली दिल्याचे पत्र आहे. तरीही म्हाडाने संघाला कोणतीही माहिती न देता, परस्पर शुल्कवाढीचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. मात्र, या निर्णयाची कोणतीही प्रत संघाला पाठविण्यात आलेली नाही. त्यामुळे भिजत घोंगडे असलेल्या अभ्युदयनगर पुनर्विकास प्रकल्पामुळे या प्रकरणात संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
>संयुक्त बैठकीला मुहूर्त कधी?
स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्याकडे रहिवाशांनी धाव घेतल्यानंतर, म्हाडा उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष लाखे यांच्यासोबत बैठक झाली. मात्र, सेवाशुल्कवाढ करण्याचा निर्णय झाल्यामुळेच ही वाढीव बिले पाठविल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, या संदर्भातील कोणतेही परिपत्रक म्हाडाने दाखविले नसल्याचा आरोप रहिवाशी संघाने केला आहे. त्यामुळे म्हाडा, महापालिका आणि रहिवाशी संघ अशी संयुक्त बैठक घेऊन, हा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन रहिवाशांनी केले आहे.
>लाख रुपये
भरायचे कुठून?
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयांच्या तीन गाळ््यांना तब्बल ३ लाख रुपयांहून अधिक भाडे आकारण्यात आले आहे. याउलट घरासाठी एक लाख रुपये आकारले आहे. इतके पैसे भरायचे कुठून?
- क्षमा हिरे,
स्थानिक रहिवासी
>म्हाडा व मनपाचा वाद!
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीनंतरही मनपाने पाणीपट्टी वाढवली. त्याचा भार म्हाडावर आला व तोच भार आता रहिवाशांच्या माथी मारला जात आहे. मात्र, हा मुद्दा म्हाडा व मनपामधील असल्याने त्यांनी तो रहिवाशांच्या माथी न मारता आपापसात सोडवावा.
- दिलीप नारकर, स्थानिक रहिवासी
>मापदंड कोणता लावला?
मुळात सेवा शुल्कात वाढ करताना कोणताही हिशेब म्हाडाने दाखवलेला नाही. थेट शुल्कवाढ करणाºया म्हाडाने आधी पारदर्शकता ठेवावी. कोणता मापदंड लावला, हे दाखवावे. कारण वाढ ही नियमाला धरून असावी. अन्यथा रहिवाशी ती कधीच मान्य करणार नाही.
- रवींद्र कामतेकर, स्थानिक रहिवासी
>८६० टक्क्यांनी सेवाशुल्कवाढ
या आधी म्हाडाकडून १९९८ साली रहिवाशांकडून १३२ रुपये सेवाशुल्क आकारले जात होते. मात्र, २०१८ साली म्हाडाने रहिवाशांना पाठविलेल्या नोटीसमध्ये १ हजार २६ रुपये सेवाशुल्क केल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे १० ते २० टक्क्यांनी वाढ करण्याऐवजी म्हाडाने थेट ८६० टक्क्यांनी वाढ केल्याने, रहिवाशांमध्ये अंसतोषाचे वातावरण पसरले आहे. म्हणूनच म्हाडाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी ठिकठिकाणी निषेधाचे फलक लावल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष राजेंद्र खानविलकर यांनी दिली.
अभ्युदयनगरमध्ये तळमजला अधिक चार मजले अशा स्वरूपाच्या ४६, तर तळमजला अधिक तीन मजले स्वरूपाच्या २ रहिवाशी इमारती आहेत. या एकूण ४८ इमारतींमध्ये सुमारे ३ हजार ४१० रहिवाशी गाळे आहेत, त्यांमध्ये राहणाºया नागरिकांचा आकडा १५ हजारांहून अधिक आहे. अभ्युदयनगरप्रमाणे म्हाडाच्या मुंबईतील ५६ वसाहतींनाही या सेवाशुल्कवाढीचा फटका बसण्याची भीती आहे.

Web Title: Aub! A lacquer bill sent by MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा