गोराईत आले फ्लेमिंगो पक्षांचे थवे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 10:44 AM2018-08-20T10:44:24+5:302018-08-20T10:48:01+5:30

बोरिवली पश्चिम येथील गोराई खाडी परिसरात फ्लेमिंगो पक्षांचे थवेच्या थवे पाहायला मिळाले. फ्लेमिंगोचे मनमोहक दृश्य गोराईकरांना दिसल्यामुळे गोराईकर सुखावले आहेत.

Arrival of flamingos at gorai beach borivali | गोराईत आले फ्लेमिंगो पक्षांचे थवे!

गोराईत आले फ्लेमिंगो पक्षांचे थवे!

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर

मुंबई - फ्लेमिंगो पक्षी हे साधारणपणे थंडीच्या मोसमात नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान मुंबईत शिवडीच्या समुद्रात तर नवी मुंबईत ऐरोली खाडीत दिसतात. मात्र गेले काही दिवस हे पक्षी वर्सोवा, लोखंडवाला, मनोरी येथे दिसले होते. त्यानंतर आता शनिवारी बोरिवली पश्चिम येथील गोराई खाडी परिसरात फ्लेमिंगो पक्षांचे थवेच्या थवे पाहायला मिळाले. फ्लेमिंगोचे मनमोहक दृश्य गोराईकरांना दिसल्यामुळे गोराईकर सुखावले असून अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले आहे.

गोराई गावातील जोरम राजा कोळी हे येथील उद्योजक व भूमिपूत्र आहेत. गोराई खाडी पार करून शनिवारी बोरिवली येथे जात असताना हे पक्षी त्यांच्या नजरेस पडले. मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी आलेले आपण प्रथमच पाहिले असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना मत्स्य अभ्यासक नंदिनी चव्हाण यांनी पावसाळ्यात आपल्या खाद्याच्या शोधात व अंडी घालण्यासाठी हे पक्षी येथे आले असावेत असं सांगितलं. तिवरांचे जंगल, 66 एकरवर वसलेले अॅस्सेलवर्ल्ड, शांत व रम्य वातावरण यामुळे तिवरांच्या जंगलात अंडी घालण्यासाठी व खाद्यासाठी हे पक्षी येथे आले असतील. स्थलांतर हा तर या पक्षांचा स्थायीभाव असून यंदा गोराई परिसर त्यांनी निवडला असावा अशी माहिती त्यांनी दिली.

देशातील टायनी पेपर आर्टमध्ये माहीर असलेल्या आणि अतिसूक्ष्म पेपरपासून विविध प्रकारचे पक्षी, फुले बनवणाऱ्या महालक्ष्मी वानखेडकर या पक्षीप्रेमी असून त्यांचा विविध प्रकारच्या पक्षांचा खास अभ्यास आहे. महालक्ष्मी या टायनी पेपर आर्टच्या सहाय्याने विविध प्रकारचे पक्षी हुबेहूब बनवतात. त्यासाठी पक्षांचा खास अभ्यास व निरीक्षण त्यांना करावे लागते असल्याचं त्यांनी सांगितले. या पक्षाबद्धल अधिक माहिती देताना त्यांनी फ्लेमिंगो पक्षांचे शास्त्रीय नाव हे रोहित पक्षी आहे. हा पाणथळ जागी थव्याने राहणारा, फिनिकोप्टेरस जातीतला पक्षी असल्याचं सांगितलं. तसेच उंच मान व लांब पाय असलेल्या रोहिताची पिसे गुलाबी किंवा फिक्या गुलाबी रंगाची असतात. यांच्या चार प्रजाती अमेरिका खंडांत आढळतात असंही म्हटलं. 

जगात मुख्यत्वे उष्ण कटिबंधात हा पक्षी आढळतो. आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर हे पक्षी आढळून येत असून वस्ती हजारोंच्या संख्येने यांचे थवे आढळून येत असून भारतात पण हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. आफ्रिकेचा काही भाग, द. युरोप आणि दक्षिण आशिया पेरू, चिली, बोलिव्हिया आणि अर्जेंटिना, कॅरिबियन बेटांवर प्रामुख्याने हे रोहित पक्षी आढळत असून खाद्यासाठी आणि अंडी घालण्यासाठी ते भारतात स्थलांतर करतात. रोहित पक्षी भारतात बहुतांशी  हे कच्छ येथे मोठ्या संख्येने  पावसाळ्यात येथे अंडी घालण्यासाठी येतात.त्यामुळे कच्छला रोहित पक्ष्यांचे शहर असे देखील म्हटले जाते. 

पावसाळ्यानंतर कच्छमध्ये पाणी जेव्हा आटते तेव्हा रोहित पक्षी भारतात अन्य ठिकाणी स्थलांतर करतात व देशभर पसरतात. पुण्याजवळील उजनी धरणाच्या पाण्यात रोहित पक्ष्यांना पोषक अशा उथळ जागा आहेत तेथे हिवाळ्यात व उन्हाळ्यात कधी कधी रोहित पक्षी आढळून येतात अशी माहिती महालक्ष्मी वानखेडकर यांनी दिली. या पक्षांचे मुख्य खाद्य म्हणजे छोटे मासे, किडे, पाणवनस्पती व शेवाळे असून काही विशिष्ट प्रकारचे शेवाळे खाल्ल्यामुळे यांच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते. हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. रोहित पक्ष्याची चोच ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतिशय सोपे जाते. तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात अशी माहितीही त्यांनी दिली. 
 

Web Title: Arrival of flamingos at gorai beach borivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई