Are Muslims in West Bengal giving 'Vande Mataram' slogans? asks Shiv Sena | पश्चिम बंगालातील मुसलमान ‘वंदे मातरम्’चे नारे देणार का? - शिवसेना 
पश्चिम बंगालातील मुसलमान ‘वंदे मातरम्’चे नारे देणार का? - शिवसेना 

मुंबई - पश्चिम बंगालात आता सरळ सरळ हिंदू आणि मुसलमान अशी फाळणी झाली आहे व ही स्थिती बंगालसारख्या सीमावर्ती राज्यास घातक आहे. भारतीय जनता पार्टीकडून ‘जय श्रीराम’चे नारे देण्यात येत आहेत त्याचा ममता बॅनर्जी यांना संताप आहे. आम्ही ‘जय हिंद’ आणि ‘वंदे मातरम्’चे नारे देऊ, असे ममता बॅनर्जी सांगतात; पण बंगालातील मुसलमान ‘वंदे मातरम्’चे नारे देणार आहेत काय? असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखातून उपस्थित केला आहे. 

मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जो राडा झाला त्यावरुन शिवसेनेने ममता बॅनर्जी यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार प. बंगालमध्ये लोकशाही मार्गाने सत्तेवर आले. त्याच लोकशाही मार्गाने त्यांचा पुन्हा विजय किंवा पराभव होईल. मोदी, शहा वगैरे नेत्यांचे रस्ते अडवून त्या यशस्वी होणार नाहीत. अमित शहा हे काही ‘भगवान’ नाहीत. त्यांच्याविरुद्ध निदर्शने झाली तर काय बिघडले? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी विचारला. अमित शहा देव नसतीलही, पण ममताही देवी दुर्गा किंवा ‘संतीण’ नाहीत. प. बंगालात आधी मार्क्सवाद्यांनी हिंसाचार पेरला, त्यात त्यांचाच बळी गेला. आता ममता बॅनर्जी नेमके तेच करीत आहेत. त्यात राज्याची होरपळ होत आहे. देशाला ते घातक आहे असं शिवसेनेने सांगितले आहे. 

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
बंगालची सभ्यता आणि संस्कृतीला तडा देणारा प्रकार मंगळवारी कोलकाता येथे घडला. लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा सुरू असतानाच हे सर्व घडले. संपूर्ण देशभरात तुरळक प्रकार वगळता निवडणुका शांततेत पार पडल्या. पण प. बंगालची भूमी या वेळी प्रथमच रणभूमी बनली. याची सुरुवात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. 

पंतप्रधान मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या सभांना बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला. भाजप नेत्यांची हेलिकॉप्टर्स कोलकाता तसेच इतरत्र उतरू न देण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांच्या सरकारने घेतला व वादळाची ठिणगी स्वतःच टाकली. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या बडय़ा नेत्यांना प. बंगालात प्रचारासाठी पाय ठेवू द्यायचा नाही, ही कसली अरेरावी? ममता बॅनर्जी या गुजरातमध्ये मोदी किंवा शहा यांच्या विरोधात प्रचारास गेल्या असत्या तर त्यांना कोणीच रोखले नसते. लोकशाहीत हे स्वातंत्र्य सगळ्यांनाच दिले आहे. 

पुन्हा प. बंगाल हा हिंदुस्थानचाच भाग आहे व तेथे जाण्या-येण्यासाठी ‘व्हिसा’ची गरज लागत नाही. गेल्या काही वर्षांपासून प. बंगालचे समाजमन अस्वस्थ आहे. बांगलादेशातून लाखो घुसखोर प. बंगालात आले आहेत व ‘व्होट बँक’ राजकारणाचा भाग म्हणून ममता बॅनर्जींनी त्यांना संपूर्ण संरक्षण दिले. 

मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांवर प. बंगाल पुन्हा काबीज करू, या त्यांच्या फाजील आत्मविश्वासाला या वेळी भाजपने हिंदुत्ववादाचे पत्ते फेकून तडे दिले. बंगालातील वातावरण मंगळवारच्या घटनेनंतर आणखी भडकले आहे. अमित शहा हे सत्ताधारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना रोखणे ही पहिली चूक व त्यांच्या शोभायात्रेत निषेध करणे व काळे झेंडे दाखवणे ही दुसरी चूक. 

अमित शहा यांच्या प्रचारयात्रेत श्रीराम, हनुमान तसेच रामायणातील प्रसंगांचे चित्ररथ होते. त्यामुळे वाद चिघळला. ममता या भडक डोक्याच्या आहेत, पण राज्यकर्त्याने डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून काम करायचे असते. प. बंगालातील हिंसाचाराने राज्यप्रमुख म्हणून ममता यांचे नाव खराब झाले. 

ईश्वरचंद्र विद्यासागर हे बंगालातील शाहू किंवा महात्मा फुले यांच्याप्रमाणे समाजसुधारक. या दंगलीत त्यांच्या पुतळ्याची मोडतोड झाली व त्याचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे. जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांच्याशी वागण्याची ही रीत नाही. 
 


Web Title: Are Muslims in West Bengal giving 'Vande Mataram' slogans? asks Shiv Sena
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.