'Appreciate that judge!' - Shiv Sena chief Uddhav Thackeray | ‘त्या न्यायाधीशांचे कौतुक!’ - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : न्यायदेवतेला मुकी-बहिरी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जे स्पष्ट बोलले त्या न्यायाधीशांचे कौतुक. त्यांच्यावर कदाचित कारवाई होईल, मात्र ही कारवाई पक्षपाती होऊ नये, अशी प्रतिक्रिया शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयातील चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांवर केलेल्या आरोपांसंबंधात दिली.
पत्रकारांशी बोलताना उद्धव म्हणाले की, शुक्रवारचा प्रकार अत्यंत धक्कादायक असून आता न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा की नाही, असा लोकांना प्रश्न पडला आहे. न्यायाधीश लोया यांच्या वादग्रस्त मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. कर नाही त्याला डर कशाला, असा सवालही त्यांनी केला.
कोपर्डी : पीडितेच्या वडिलांनी घेतली भेट
कोपर्डीच्या (जि. अहमदनगर) घटनेतील पीडितेचे वडील व काही ग्रामस्थांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवन येथे भेट घेतली. या चर्चेच्या वेळी आ. डॉ. नीलम गोºहे, मुलीचे वडील तसेच ग्रामस्थ समीर पाटील जगताप आदी उपस्थित होते. चर्चेमध्ये प्रामुख्याने आरोपींच्या वतीने उच्च न्यायालयात जे अपील करण्यात आले आहे, त्या अपिलाविरुद्ध लढण्यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मुलीचे वडील व ग्रामस्थांनी केली.
संबंधित विषयावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू. कोपर्डी येथे इयत्ता बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यासाठी लागणाºया जमिनीकरता आपण महसूलमंत्र्यांशी चर्चा करू, असेही ठाकरे यांनी सांगितले.