Another 'nephew' met with Sharad Pawar, dhawalsingh mohite patil in mumbai | विजयसिंह मोहिते पाटलांचा 'पुतण्या' शरद पवारांच्या भेटीला, माढ्यात राजकारण तापलं
विजयसिंह मोहिते पाटलांचा 'पुतण्या' शरद पवारांच्या भेटीला, माढ्यात राजकारण तापलं

मुंबई - रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेनेचे सहसंपर्क नेते डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपात प्रवेशाची  गुणगूण लागताच धवलसिंह यांनी पवारांची भेट घेतली. त्यामुळे आता माढा मतदारसंघात पुन्हा एकदा भाऊबंदकीचा वाद उफाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, माढ्यातून राष्ट्रवादीचे तिकीट कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

मुंबईत डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्यात भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, जी वेळ साधत धवलसिंह यांनी पवारांची भेट घेतली. त्यावरुन सोलापूरच्या राजकारणात वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. तर, आता राष्ट्रवादीकडून धवलसिंह यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले जाईल का? अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे पुतण्यांना जवळ करणारे शरद पवार आता, विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुतण्याला किती जवळ करतात, हे लवकरच दिसणार आहे.

कोण आहेत धवलसिंह मोहिते पाटील ?

धवलसिंह हे माजी सहकार राज्यमंत्री दिवंगत प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत. अकलुजमधील मोठी ताकद असलेला युवा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सोलापूर जिल्हा परिषदमध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केलेले असून अनेक संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे धवलसिंह हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे असून रणजीतसिंह मोहिते पाटलांचे चुलत बंधू आहेत. मात्र, सध्या या दोन्ही भावांमध्ये कौटुंबिक वाद असल्यामुळे हे ऐकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच, पुतण्याला जवळ करण्यात हातखंडा असलेल्या पवारांच्या हाताला आणखी एक पुतण्या भेटल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटील यांना माढा लोकसभेची उमेदवारी दिली जाणार होती. त्यांच्या नावावर पक्षाध्यक्ष शरद यांनी शिक्कामोर्तबही केले होते आणि तसे त्यांना कळवण्यात आले होते असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिला आहे. मात्र, अद्यापही विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतच असून त्यांनी भाजपा प्रवेश केला नाही.  


Web Title: Another 'nephew' met with Sharad Pawar, dhawalsingh mohite patil in mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.