Ambedkar followers coming to Chaityibhumi, Greater Mumbai Municipal Corporation, accommodation arrangements in schools | चैत्यभूमी येथे येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांची बृहन्मुंबई महापालिका शाळांमध्ये निवासाची व्यवस्था 

 मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनांक ०६ डिसेंबर २०१७ रोजी असलेल्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दाखल झालेल्या आंबेडकर अनुयायांची ओखी चक्रीवादळामुळे कोसळणाऱया पावसाने बृहन्मुंबई महापालिकेच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत महापालिकेच्या ७० शाळांमध्ये तात्पुरत्या निवासाची सर्व सुखसोयींसह व्यवस्था करण्यात आली आहे.    
ज्या शाळांमध्ये  अनुयायींकरिता तात्पुरत्या निवाऱयाची सोय करण्यात आली आहे, त्याठिकाणी वैद्यकीय तपासणीदेखील सुरु करण्यात आली आहे. तसेच दादर रेल्वे स्टेशनवर उतरणाऱया अनुयायींना शिवाजी पार्क मंडपात न घेऊन जाता त्यांना विनाशुल्क बेस्ट बसेसव्दारे आसपासच्या परिसरात उपलब्ध असणाऱया शाळांमध्ये नेण्यात येत आहे.
ओखी चक्रीवादळ व दिनांक 04.12.2017 ते 07.12.2017 या कालावधीत समुद्रास असलेल्या 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या भरतीच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेमार्फत खालील उपाययोजना करण्यात आल्या आहेतः
1.    समुद्रकिना-यापासून जवळ असणा-या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिका-यांची पथके तयार करुन गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.                                                                  
2.    अग्निशमन दल, पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, नौदल यांची पथके चैत्यभूमी परिसरात तैनात ठेवण्यात आली आहेत, तर भारतीय तटरक्षक दलास सतर्क ठेवण्यात आले आहे. 
3.    महापालिकेचे 24 विभागीय नियंत्रण कक्ष सतर्क ठेवण्यात आले असून आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. 
4.    चैत्यभूमी परिसरात महानगरपालिकेचे कर्मचारी कार्यरत असून अशासकिय संस्थांची मदत देखील घेण्यात आली आहे. 
                                                       
5.    दिनांक 04.12.2017 पासून पडत असलेल्या पावसामुळे शिवाजी पार्क परिसरात चिखलाचे वातावरण तयार झाले असून दिनांक 06.12.2017 रोजी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी परिसरात येणा-या आंबेडकरी अनुयायांकरिता राहण्याची व्यवस्था करण्याकरिता ७० शाळा उघडून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रकारे चैत्यभूमीपरिसरात असणारे हॉल्स व सभागृहे देखील उघडी ठेवण्यात आली आहेत.
6.    दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमीकडे जाण्याकरिता बीईएसटीमार्फत मोफत बस सेवा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याचे पैसे महापालिकेमार्फत बीईएसटीला अदा करण्यात येणार आहेत.
7.    चैत्यभूमी परिसरात येणा-या अनुयायांकरिता जेवणाची व पाण्याची व्यवस्था तात्पुरत्या निवा-यांच्या ठिकाणी संबंधित सहाय्यक आयुक्त व अशासकिय संस्थांमार्फत करण्यात आलेली आहे.
8.    चैत्यभूमी परिसरात कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये याकरिता उपायुक्त (परिमंडळ – 2) व त्यांच्या सहाय्याकरिता 3 सहाय्यक आयुक्तांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
9.    चैत्यभूमी परिसरात 9 तात्पुरते आरोग्य कक्ष उभारण्यात अाले  असून अधिक मदतीकरिता महापालिकेच्या व 108 आणीबाणी वैद्यकिय सेवेच्या रुग्णवाहिका तत्पर ठेवण्यात आल्या आहेत.
10.    तात्पुरत्या निवा-यांच्या ठिकाणी आरोग्य सेवेसाठी वैद्यकिय पथके नेमण्यात आली आहेत.
नागरिकांना आवाहनः ओखी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही रस्ते, पूल, सि लिंक बंद ठेवण्यात आलेले नाहीत. मुंबई शहर व उपनगरातील रेल्वे सेवा, वाहतूक सेवा सुरळीत सुरु आहे. नागरिकांनी / पर्यटकांनी कृपया समुद्रकिनारी आत जाणे टाळावे तसेच अफवा पसरवू नयेत व अफवांवर विश्वास ठेवू नये.


Web Title: Ambedkar followers coming to Chaityibhumi, Greater Mumbai Municipal Corporation, accommodation arrangements in schools
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.