ठळक मुद्देकल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये जागा अडविणाऱ्या महिलांवर लोहमार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. लोकलमध्ये जागा अडविणाऱ्या महिलांना लोहमार्ग पोलिसांनी गुरूवारी सकाळी ताब्यात घेतलं.  जागा अडविणाऱ्या 15 ते 20 महिलांना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

कल्याण, दि. 17- कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये जागा अडविणाऱ्या महिलांवर लोहमार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. लोकलमध्ये जागा अडविणाऱ्या महिलांना लोहमार्ग पोलिसांनी गुरूवारी सकाळी ताब्यात घेतलं.  जागा अडविणाऱ्या 15 ते 20 महिलांना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुरूवारी सकाळी सापळा रचून जीआरपीने ही संपूर्ण कारवाई केली आहे. बुधवारी वेल्हाळ नामक महिला प्रवाशाला ट्रेनमधील जागेवरून काही महिलांनी मारहाण केली होती. त्यानुसार सीएसटी स्थानकात लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती ती तक्रार बुधवारी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली होती.  त्यानुसार कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ट्रेनमध्ये बसणाच्या जागेवरून महिलेला झालेल्या मारहाणीची बातमी लोकमतने बुधवारी दिली होती. 

ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांनी लोहमार्ग पोलिसांना मारहाण-धक्काबुक्कीची वेळ का आली याचं स्पष्टीकरण दिल्याचं समजतं आहे. पण तक्रारदार तक्रार मागे घेण्यास अद्यापतरी तयार नसल्याने लोहमार्ग पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळतं आहे.

जागेवरून झालेल्या वादातून डोंबिवलीतील महिला प्रवाशांना मारहाण करत, उठविण्याचा प्रकार कल्याण स्थानकात बुधवारी सकाळी घडला. या प्रकरणी मारहाण झालेल्या महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) गाठल्यानंतर तेथे लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली आहे. चारुमती वेल्हाळ (रा. डोंबिवली) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. चारुमती मुंबईत कामाला आहेत. लोकलमध्ये बसायला जागा मिळावी, यासाठी त्या दररोज सकाळी ८.२१ च्या गाडीने डोंबिवलीहून कल्याण गाठतात. ती लोकल सीएसएमटीकरिता फलाट क्रमांक-५ वरून ८.३६ वाजता सुटते. चारुमती यांनी बुधवारीही ८.२१ च्या लोकलने कल्याण गाठलं. मात्र, सीएसएमटीकरिता ही लोकल ८.४५ वाजता सुटली. या वेळी कल्याण स्थानकात लोकलमध्ये चढलेल्या महिलांनी आधीपासून बसून आलेल्या महिलांना उठण्यासाठी जबरदस्ती केली. त्याला विरोध करताच, त्यांना धक्काबुक्की करत पर्स खेचत मारहाण केली. त्यात त्यांना नखं लागली, पर्स तुटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी सुरेखा माने यांनी दिली. चारुमती यांनी सीएसएमटीला उतरल्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेथील पोलिसांनी ही तक्रार कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग केली.