वाडिया रुग्णालयात आठ वर्षांच्या लहानग्यावर दुर्मीळ शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 04:54 AM2018-12-16T04:54:02+5:302018-12-16T04:54:45+5:30

नांदेड येथील ताल्हा या ८ वर्षांच्या मुलाला खेळण्यांशी खेळायचे होते. ती खेळणी कपाटाच्या मागील बाजूस ठेवली होती.

8 years old rare surgery in Wadia hospital | वाडिया रुग्णालयात आठ वर्षांच्या लहानग्यावर दुर्मीळ शस्त्रक्रिया

वाडिया रुग्णालयात आठ वर्षांच्या लहानग्यावर दुर्मीळ शस्त्रक्रिया

googlenewsNext

मुंबई : परळ येथील बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात आठ वर्षांच्या मुलावर मायक्रोव्हॅस्क्युलर ही दुर्मीळ शस्त्रक्रिया पार पडली आहे. साप चावल्यानंतर झालेल्या गंभीर संसर्गामुळे ताल्हा उमर शेख याच्या डाव्या हातात व्यंग निर्माण झाले होते. मात्र आता शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती सुधारत असून लवकरच त्या हाताने हालचाल करणेही शक्य होणार आहे.

नांदेड येथील ताल्हा या ८ वर्षांच्या मुलाला खेळण्यांशी खेळायचे होते. ती खेळणी कपाटाच्या मागील बाजूस ठेवली होती. कपाटाच्या मागे साप दडून बसला असेल, याची त्याला कल्पना नव्हती. जेव्हा त्याने आपले खेळणे काढायला कपाटाच्या मागे हात घातला तेव्हा सापाने त्याला दंश केला. त्याला ताबडतोब स्थानिक डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला सर्पदंशावरील इंजेक्शन दिले. काही दिवसांनंतर डावा हात सेल्युलायटिसमुळे सुजला आणि डाव्या हातात संसर्ग झाला. परिणामी, हात कापावा लागेल हा एकच पर्याय तेथील डॉक्टरांनी दिला. त्यानंतर मुंबईतील सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. हात वाचविण्यात डॉक्टरांना यश आले, पण जखम बरी होण्यास विलंब लागला. जखमेवर कोणतेही आवरण देण्यात आले नव्हते़ त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संकुचन झाले होते आणि डावे मनगट व हातामध्ये व्यंग निर्माण झाले. या व्यंगावर काही उपचार करता येईल का याची चाचपणी करण्यासाठी त्याचे पालक त्याला वाडिया रुग्णालयात घेऊन आले.
याविषयी वाडिया रुग्णालयाचे प्लास्टिक, हँड आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई यांनी सांगितले की, रुग्ण आला तेव्हा व्यंग असलेल्या हाताने कोणेतीही कृती करता येत नव्हती. डाव्या हाताच्या पृष्ठभागावर त्वचा व स्नायूंचा नेक्रॉसिस (उतिनाश) झाला होता आणि मनगट ते कोपरापर्यंतच्या हातामध्ये व्यंग निर्माण झाले होते. व्यंगावर उपचार करण्यासाठी, आकुंचन पावलेली त्वचा मोकळी करण्यासाठी आणि मायक्रोव्हॅस्क्युलर फ्री टिश्यु ट्रान्सफर करून शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. व्रण गंभीर आणि मोठा होता. त्यामुळे शस्त्रक्रिया गुंतागुंतीची झाली. मनगट व हाताची पूर्ण हालचाल व्हावी हे ध्येय होते. डाव्या मनगट ते कोपरापर्यंतचा हात आणि हातावरील जाड थर झालेला व्रण कापण्यात आला. डाव्या मनगटाचे काठीण्य आणि संकुचन मोकळे करण्यात आले आणि हाताची पूर्ण हालचाल साध्य करण्यात आली. डाव्या मांडीवरील त्वचा व मऊ उतीचा पट्टा काढण्यात आला. त्या पट्ट्यातील रक्तवाहिन्या मायक्रोस्कोपचा उपयोग करून मायक्रोव्हॅस्क्युलर तंत्राने प्रकोष्ठाच्या रक्तवाहिन्यांशी जोडण्यात आल्या. त्यामुळे या प्रकरणात तांत्रिक आव्हान व जोखीम अधिक होती.

Web Title: 8 years old rare surgery in Wadia hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.