यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ६०/४० प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:30 AM2019-06-04T04:30:02+5:302019-06-04T04:30:13+5:30

संघटनांचा विरोध; विधि अभ्यासक्रमाबाबत मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय

60/40 system from this year's academic year | यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ६०/४० प्रणाली

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ६०/४० प्रणाली

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाने २० मे, २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षात विधि (लॉ) अभ्यासक्रमासाठी ६०/४० प्रणाली राबविण्याचे निश्चित केले आहे. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाकडून आणि अकॅडेमिक कौन्सिलकडून सदर प्रणालीला मान्यता मिळाल्याने, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ही प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. मात्र, विद्यार्थी संघटनांनी याला तीव्र विरोध केला आहे.

मुंबई विद्यापीठाने गेल्या काही वर्षांपूर्वी श्रेयांक श्रेणी ही पद्धत सुरू केली आहे. या प्रणालीच्या अनुषंगाने विद्यापीठाने लॉ शाखेच्या परीक्षा पद्धतीत बदल केला होता. २४ आॅगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाने लॉसाठी ६०/४० हा नवा पॅटर्न सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये ६० गुणांची लेखी परीक्षा आणि ४० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा होती. लॉच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ६०/४० हा पॅटर्न अंमलात आणला होता, पण या परीक्षा पॅटर्नला स्टुडंट लॉ कौन्सिल आणि इतर विद्यार्थी संघटनांनी विरोध केला. वांद्रेतील पार्थसारथी सराफ या विद्यार्थ्याने अ‍ॅड. सचिन पवार यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर या प्रणालीला स्थगिती मिळाली होती. मात्र, आता मुंबई विद्यापीठाकडून पुन्हा ही प्रणाली राबविण्यात येणार आहे.

स्टुडंट लॉ कॉन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले की, आमचा या प्रणालीला विरोध नाही. मात्र, त्यासाठी आवश्यक तरतुदी करणे आवश्यक होते. आजही मुंबई विद्यापीठात पुरेशी लॉ फॅकल्टी नाही. महाविद्यालयांत जी फॅकल्टी आहे, ती सर्वच बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या नियमांत बसत नाही, विधि महाविद्यालयांच्या पेपर तपासणीसाठी शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण दिले जात नाही, अशा अनेक बाबींची पूर्तता अद्याप विद्यापीठाने केली नसल्याची माहिती पवार यांनी दिली. तर, मुंबई विद्यापीठाने घाई न करता, आधी या बाबींची पूर्तता करावी, त्यानंतरच ही प्रणाली राबवावी, अशी मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलने केली.

Web Title: 60/40 system from this year's academic year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.