त्याने पळविले ५७ हजारांचे ‘टोमॅटो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:59 AM2017-08-17T05:59:40+5:302017-08-17T05:59:42+5:30

आतापर्यंत सोने, चांदी, पैसे, मोबाइल पळवणारे चोर आपल्याला माहीत आहेत;

57 kg of 'tomatoes' | त्याने पळविले ५७ हजारांचे ‘टोमॅटो’

त्याने पळविले ५७ हजारांचे ‘टोमॅटो’

Next

मुंबई : आतापर्यंत सोने, चांदी, पैसे, मोबाइल पळवणारे चोर आपल्याला माहीत आहेत; परंतु आता टोमॅटोलाही चांगला भाव येत असल्याने एकाने चक्क ५७ हजारांचे टोमॅटो पळवल्याचे उघडकीस आले आहे. ‘टोमॅटो’चे तीस क्रेट्स घेऊन पसार झालेल्या या टेम्पोचालकाला अटक करण्यात दहिसर पोलिसांना यश आले आहे.
चंद्रशेखर राधेश्याम गुप्ता (५१), असे अटक करण्यात आलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. तो कुर्ल्यातील बैलबाजारातील राहणारा आहे. १६ जुलै रोजी जवळपास ९०० किलो टोमॅटोची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी भाजीविक्रेते शांतीलाल श्रीवास्तव यांनी १८ जुलैला दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी पोलिसांनी केली. त्यात समर्थ कृपा ट्रान्सपोर्ट असे लिहिलेला एक संशयित टेम्पो निदर्शनास आला. या टेम्पोचा नंबर मिळवून पोलिसांनी गुप्ताचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर त्याला १५ आॅगस्ट रोजी राहत्या घरातून अटक करण्यात आली.
त्याच्यावर मुलुंडमध्येही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याचे दहिसर पोलिसांनी सांगितले. मात्र, त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दहिसरच्या शांतीनगरमध्ये राहणारे श्रीवास्तव हे अनेक वर्षांपासून टोमॅटोचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधून रोज रात्री भाजी येते. मात्र, पहिल्यांदाच टोमॅटोचोरीचा प्रकार घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गुप्ताने गुन्ह्याची कबुली दिल्याचे दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे यांनी सांगितले. स्थानिक न्यायालयाने त्याला १८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
>मुलुंडमध्येही चोरी
टोमॅटो चोराने अशाच प्रकारे मुलुंडमध्येही चोरी केली असल्याचे उघडकीस आले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Web Title: 57 kg of 'tomatoes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.