२६ टक्के मुंबईकरांना उच्च रक्तदाब

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:50 AM2019-04-25T05:50:37+5:302019-04-25T05:50:59+5:30

मधुमेहाचाही वाढता धोका; पालिकेच्या वैद्यकीय शिबिरातील निरीक्षण

26 percent of Mumbai's high blood pressure | २६ टक्के मुंबईकरांना उच्च रक्तदाब

२६ टक्के मुंबईकरांना उच्च रक्तदाब

Next

मुंबई : गेल्या काही वर्षांत मुंबईकरांची जीवनशैली बदलली आहे. या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर झालेला दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नुकत्याच झालेल्या वैद्यकीय शिबिरांतून २६ टक्के मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचा त्रास तर २५ टक्के रुग्णांना मधुमेह असल्याचे समोर आले आहे. रुग्णांमधील रक्तदाबाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रक्तदाब वाढत असला तरीही ही व्याधी असल्याची पुसटशी कल्पनाही अनेक रुग्णांना नसल्याची धक्कादायक माहिती या शिबिरांमधून समोर आली आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने माहिम, मालाड आणि चेंबूर-गोवंडी या परिसरात गेल्या काही महिन्यांत वैद्यकीय शिबिरे घेतली. या परिसरातील झोपडपट्ट्या आणि बैठ्या वस्त्यांमधील स्थानिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न वैद्यकीय शिबिरांतून करण्यात आला. तिन्ही वैद्यकीय शिबिरांतून ५९०हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरांत सहभागी रुग्ण ४० ते ५० या वयोगटांतील असल्याची माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाचे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी दिली. या वैद्यकीय शिबिरांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोगाच्या तपासण्या करण्यात आल्या. मात्र अद्याप कर्करोगाचे वैद्यकीय अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ. रेवणकर यांनी सांगितले.

रक्तदाब विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार आहे. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा सजग झाले पाहिजे. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, यांत्रिक युगात तणावाचे प्रमाण वाढले आहे. उच्च रक्तदाब वेळीच नियंत्रणात आणला नाही, तर अशा व्यक्तींना पुढे हृदयविकार किंवा इतर दुष्परिणामांना सामोरे जाऊ लागू शकते. मधुमेह टाळण्याची सर्वांत पहिली पायरी म्हणजे त्याचे लवकर निदान होणे. त्यासाठी ठरावीक काळाने रक्तशर्करेची तपासणी करणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

पस्तिशीनंतर आरोग्य तपासणी करणे गरजेचे
आपल्याकडे आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करण्याचे प्रमाण आजही कमी आहे. नुकत्याच पार पडलेल्या आरोग्य शिबिरांतून हेच समोर आले आहे. परिणामी, आता वेळीच आरोग्याकडे लक्ष देऊन वयाच्या पस्तिशीनंतर दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. कुठल्याही आजाराचे लवकर निदान होणे हे तो आजार नियंत्रित करण्याची पहिली पायरी असते, हे लक्षात घेतले पाहिजे.
- डॉ. संतोष रेवणकर, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका आरोग्य विभाग

Web Title: 26 percent of Mumbai's high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य