१५ दिवसांत २० लाख रुपयांचे अवैध मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:40 AM2019-07-21T01:40:59+5:302019-07-21T01:41:19+5:30

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। ठिकठिकाणी टाकले छापे

In 15 days, illegal liquor worth 20 lakh rupees was seized | १५ दिवसांत २० लाख रुपयांचे अवैध मद्य जप्त

१५ दिवसांत २० लाख रुपयांचे अवैध मद्य जप्त

Next

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या १५ दिवसांत केलेल्या तीन विविध कारवायांमध्ये सुमारे २० लाख रुपये किमतीचे अवैध मद्य जप्त केले आहे. पुढील काळात अवैध मद्य विक्री विरोधात अधिक कडक कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील अवैध मद्यविक्रीला चाप लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शनिवारी खार पश्चिम येथे कारवाई करून ८ लाख २३ हजार रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले. हे मद्य दुबईहून आणण्यात आले होते व अंधेरी, खार परिसरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये त्याची विक्री केली जात होती. उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या नेतृत्वाखाली व यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे निरीक्षक जनार्दन खिल्लारे यांनी सांगितले.

या प्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दुबईतून येताना प्रवाशांद्वारे विदेशी मद्य आणायचे व त्याची विक्री मुंबईत करायची, अशी पद्धत यामध्ये अवलंबली जात होती. या कारवाईत दुय्यम निरीक्षक रवींद्र पाटणे, नीलेश गोसावी, शाम कोळी व जवानांनी सहभाग घेतला.

याबाबत अधिक तपास सुरू आहे. बुधवारच्या कारवाईत खार येथून ३ लाख ३६ हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य (स्कॉच) जप्त करण्यात आले होते. उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई उपनगर जिल्हा अधीक्षक एम.एस.वरदे यांनी अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई उपनगरमधील ओ विभागाचे निरीक्षक शिवशंकर पाटील, दुय्यम निरीक्षक समित विश्वासराव व इतरांनी सहभाग घेतला होता. संचालक उषा वर्मा यांचे सहकार्य या कारवायांमध्ये लाभल्याचे सांगण्यात आले.

अवैध दारू केली अंधेरी रेल्वे पोलिसांनी जप्त
अरावली एक्स्प्रेसमधून १५ हजार रुपयांची अवैध दारू अंधेरी रेल्वे पोलिसांनी जप्त केली. शुक्रवारी रात्री ८च्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकावर अरावली एक्स्प्रेस थांबली होती. यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की, एक्स्प्रेसमधून दारूच्या बॅगा नेण्यात येत आहेत. पोलीस तत्काळ एक्स्प्रेसमध्ये गेले. पोलिसांनी दारू घेऊन जाणाऱ्यांच्या सामानाची झडती घेतली असता, अवैध दारू दिसून आली. पोलिसांनी आरोपी मुनीर शेख (४५), सुमीत गागडे (२७) यांना पकडले आणि दारू जप्त केली. यावेळी अरावली एक्स्प्रेस बोरीवली स्थानकावर आली होती. पोलीस अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ येत असताना आरोपींनी अजय आचरे नावाचा साथीदार पळून गेल्याचे सांगितले.

Web Title: In 15 days, illegal liquor worth 20 lakh rupees was seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.