Yash Kulkarni and Dattatray Dharme Ghat | यश कुलकर्णी आणि दत्तात्रय धर्मे यांचा घाट

जीवनातील अडी-अडचणींचा सामना करण्यासाठी जवळच्या माणसांची साथ ही प्रचंड महत्त्वपूर्ण असते. यारी-दोस्ती, जवळच्या माणसांची साथ, माणुसकी जपणं अशा मूल्यांचा वेध घेत जगण्याची धडपड दाखवणारा ‘घाट’ हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. जरे एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘घाट’ चित्रपटाची निर्मिती सचिन जरे यांनी केली असून दिग्दर्शन राज गोरडे यांनी केले आहे. 
‘घाट’ चित्रपट दोन लहान मुलांच्या भावविश्वावर आधारलेला आहे. या दोन लहान मुलांच्या माध्यमातून भोवतालच्या इतर नातेसंबधावरही हा चित्रपट प्रकाश टाकतो. चित्रपटाची कथा घडते ती इंद्रायणीच्या घाटावर. जगण्याच्या केविलवाण्या धडपडीत शिकण्याचे स्वप्न उराशी बाळगून मन्या घाटावर राहतो. पण आईचे आजारपण, दारुडा बाप आणि घाटावर कमी होत चाललेला रोजगार... यावर मात करत मन्या आपल्या बहिणीला, आईला आणि पप्याला कसा सांभाळतो याच्या जिद्दीची लढाई म्हणजे ‘घाट’ हा चित्रपट. चित्रपटाचा नायक असलेल्या मन्याच्या पाठीशी त्याचा मित्र पप्या कशाप्रकारे खंबीरपणे उभा राहतो. त्याचे स्वप्न साकारायला कशाप्रकारे मदत करतो याचा संवेदनशील प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांच्या जगण्यातील वास्तव ‘घाट’ च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.
या चित्रपटाची कथा- पटकथा- संवाद राज गोरडे यांचे आहेत. यश कुलकर्णी आणि दत्तात्रय धर्मे या दोन लहान मुलांसह मिताली जगताप, उमेश जगताप, रिया गवळी यांच्याही घाट मध्ये मुख्य भूमिका आहेत. अमोल गोळे यांनी या चित्रपटाचे छायांकन केले आहे. रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या महावीर साबन्नवार यांनी साऊंड डिझाइनिंगचे काम पाहिले आहे.  चित्रपटातील ज्ञानोबा माऊलीचा गजर गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिला असून सोना मोहपात्रा यांनी तो स्वरबद्ध केला आहे. प्रकाश बल्लाळ या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत, तर सागर वंजारी संकलक आहेत. रंगभूषा आणि केशभूषा रसिका रावडे यांनी केली असून शीतल पावसकर यांनी कॅास्च्युम डिझाइन केले आहेत. विठ्ठल गोरडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. तर विनायक पाटील निर्मिती व्यवस्थापक आहेत.

Also Read : आईने केलेल्या विनवणींमुळे या कलाकाराला मिळाली घाट या चित्रपटात काम करण्याची संधी

 
Web Title: Yash Kulkarni and Dattatray Dharme Ghat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.