Without a good role, Ashok Saraf will not work | चांगल्या भूमिका असल्याशिवाय काम करणार नाहीः अशोक सराफ

आयत्या घरात घरोबा, एक डाव भूताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येदेखील खूप चांगल्या भूमिका केल्या आहेत. ते शेंटिमेंटल या चित्रपटात सध्या मुख्य भूमिकेत झळकत आहेत. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद...

तुम्ही गेल्या अनेक वर्षांत खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करत आहात, याचे कारण काय?
मी आजवर २५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अनेक चित्रपटात कॉमेडी केली आहे. काही चित्रपटांमध्ये मी खलनायकाच्या भूमिकेत झळकलो आहे. प्रत्येक भूमिकेत मी काहीतरी वेगळे करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. मी प्रत्येक भूमिका चोखंदळपणे निवडतो. गेल्या काही महिन्यांपासून माझ्याकडे ज्या पटकथा येत होत्या. त्या पटकथांमध्ये तितकास दम नसल्याचे मला जाणवत होते. मला चित्रपटात अभिनेता अथवा अभिनेत्याच्या वडिलांची भूमिका साकारण्यात रस नाहीये. एखादी चांगली भूमिका असल्यासच काम करायचे असे मी ठरवले आहे.

शेंटिमेंटल या चित्रपटाला तुम्ही होकार देण्यामागचे कारण काय?
शेंटिमेंटल या चित्रपटाच्या निमित्ताने समीर (समीर पाटील) मला भेटायला आला होता. त्यावेळी मी त्याला माझ्या घरातील एका कोपऱ्यात असलेला फाइलचा गठ्ठा दाखवला. माझ्याकडे इतक्या पटकथा आल्या आहेत. या सगळ्यामधून मी तुझाच चित्रपट का करू असे मी त्याला म्हटलो होतो. त्यावर या चित्रपटाची पटकथा वाचून मी निर्णय घ्यावा असे त्याने मला सांगितले. ही पटकथा वाचल्यावर मला ती खूप आवडली. आजवर पोलिसांच्या आयुष्यावर अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. पण या सगळ्यात हा चित्रपट खूप वेगळा आहे. 

तुम्ही आजवर अनेक चित्रपटांमध्ये पोलिसाच्या भूमिकेत झळकला आहात, या भूमिकेत प्रेक्षकांना काय वेगळेपण पाहायला मिळणार आहे.
शेंटिमेंटल या चित्रपटात मी रंगवलेली पोलिसाची भूमिका आजवर मी साकारलेल्या सगळ्या पोलिसांच्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे.
या चित्रपटातील पोलिसांची व्यक्तिरेखा खूपच वेगळ्या प्रकारे दाखवण्यात आली आहे. आपल्याला पोलिसांच्या भावना कधीच कळत नाही. ते देखील माणूस असतात या भावनेने आपण त्यांच्याकडे पाहिले पाहिजे हेच शेंटिमेंटलमधून आम्ही दाखवले आहे.

गेल्या काही वर्षांत प्रमोशन किती बदलले आहे असे तुम्हाला वाटते?
गेल्या काही वर्षांपर्यंत चित्रपटांचे प्रमोशन करणे हा फंडाच नव्हता. वर्तमानपत्रात येणाऱ्या समीक्षकेवरून चित्रपट कसा आहे हे प्रेक्षक ठरवायचे आणि त्यानंतरच ते चित्रपट पाहायला जायचे. तसेच माऊथ पब्लिसिटी ही अतिशय महत्त्वाची असायची. पण आता तसे राहिलेले नाही. आता चित्रपटांसाठी विविध माध्यमाद्वारे प्रमोशन करावे लागते. त्या काळात प्रमोशन होत नसले तरी माझ्या शंभरहून अधिक चित्रपटांची सिलव्हर ज्युबली झाली आहे. 

तुम्ही या क्षेत्रात येण्याअगोदर बँकेत काम करत होता, त्यावेळेच्या काही आठवणी जाणून घ्यायला आवडतील
मी १९७४ला पहिला चित्रपट केला. पण त्यानंतरही मी बँकेत नोकरी करणे सोडले नव्हते. पण चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे मला नोकरीला जाणे जमायचे नाही. १९७८ला तर संपूर्ण वर्षभर मी बँकेत गेलोच नव्हतो. मला बरे नाही असे सांगत मी मेडिकल सर्टिफिकेट दिले होते. पण मी काही महिने ऑफिसला गेलेलोच नसल्याने माझ्या ऑफिसमधील काही वरिष्ठ घरी आले. मी त्यावेळी घरी नव्हतो. माझ्या बहिणीने दरवाजा उघडला. मी कुठे आहे असे तिला विचारले असता मी कोल्हापूरला गेलो असल्याचे तिने सांगितले. आता माझी वाट लागली असेच मला वाटले होते. पण माझ्या बँकेतील लोकांनी मला खूप सांभाळून घेतले. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्यांनी माझा रिपोर्ट तीन महिने वरिष्ठांना दिलाच नव्हता. माझ्या बँकेतील मंडळी माझ्या वाटणीची कामे करत असत. मी चित्रपटात काम करत असलो तरी नोकरी सोडण्याचा धोका मी पत्करू शकत नव्हतो. त्यामुळे मला नोकरीतून हकलून देत नाही तोपर्यंत मी नोकरी सोडणार नाही असेच मी ठरवले होते. पण अखेर माझ्यामुळे माझ्या सहकर्मचाऱ्यांना त्रास होत आहे असे मला वाटल्याने मी नोकरी सोडली.
Web Title: Without a good role, Ashok Saraf will not work
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.