Will definitely work in the series if a series of definitive parts is offered: Sachin Khedekar | ठरावीक भागांची मालिका ऑफर झाल्यास मालिकेत नक्कीच काम करेनः सचिन खेडेकर

मराठीतील दिग्गज अभिनेते प्रेक्षकांना बापजन्म या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या आजवरच्या भूमिकेविषयी आणि त्यांच्या करियरविषयी त्यांनी मारलेल्या गप्पा...

बापजन्म हा चित्रपट स्वीकारण्यामागे काय कारण होते?
आजवर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला आई-वडील हे शोषित आहे असेच दाखवण्यात आले आहे. पण या चित्रपटाद्वारे वडिलांचे एक वेगळे रूप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बापजन्म या चित्रपटातील बाप हा एकाकी असून आपल्या मुलांना पुन्हा भेटण्याची इच्छा त्याच्या मनात आहे. आपल्या मुलांना पुन्हा भेटण्यासाठी त्याने केलेले मजेशीर प्रयत्न या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. एका बापाचा बाप म्हणून झालेला पुनर्जन्म प्रेक्षकांना या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात एक वेगळी कथा मांडली जात असून पात्रांकडे पाहाण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असल्याचे मला जाणवल्याने या चित्रपटात काम करण्यासाठी मी होकार केला. कामामध्ये आपण व्यग्र असाना अनेकवेळा आपल्याला कुटुंबाला वेळ देत नाही. पण एकदा आपली जवळचे लोक लांब गेले की त्यांना पुन्हा जवळ आणणे हे खूप कठीण असते असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

बापजन्म या चित्रपटाचा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीचा हा पहिलाच चित्रपट आहे. नव्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
आज अनेक वर्षं मी चित्रपट, मालिकांमध्ये काम करत आहे. कधीकधी कामात तोचतोच पणा आला असल्याचे मला जाणवते. पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या नवीन दिग्दर्शकासोबत काम करता, त्यावेळी तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आजची पिढी ही खूप वेगळी आहे. ही पिढी भावनिकदृष्ट्या कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. अतिशय प्रगत विचार करणारी ही पिढी आहे. त्यांच्यावर सोशल मीडियाचा प्रभाव तर खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना एक वेगळा अनुभव मिळतो. या चित्रपटात अनेक तरुण मंडळी आहेत, त्यांच्यासोबत काम करताना तर ही नवीन पिढी मला त्यांच्यात घेईल का हा प्रश्न मला पडला होता. पण या सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली. 

सैलाब, थोडा है थोडी की जरुरत है, टीचर यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये तुम्ही काम केले होते. पण सध्या तुम्ही छोट्या पडद्यापासून दूर आहात, याचे काही खास कारण आहे का?
टिव्ही या माध्यमाने मला खरी ओळख मिळवून दिली, त्याच्यामुळे हे माध्यम माझ्यासाठी खूप खास आहे. पण आज छोटा पडदा खूप बदलला आहे. छोटा पडदा आता खूपच मोठा झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या आपण खूपच प्रगती केली आहे. पण मालिका अनेक वर्षं सुरू असतात. तसेच दिवसातील अनेक तास कलाकारांना चित्रीकरण करावे लागते. एक कलाकार म्हणून मी हे नक्कीच करू शकत नाही. पण भविष्यात एखादी ठरावीक एपिसोडची मालिका मला ऑफर झाल्यास मी नक्कीच मालिकेत काम करण्याचा विचार करेन.

आज इतक्या वर्षांनी चित्रपट स्वीकारताना कोणती गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची असते?
माझ्यासाठी चित्रपटाची संहिता ही सगळ्यात महत्त्वाची असते. आज मी चित्रपटाच्या संख्येचा विचार न करता गुणवत्तेचा विचार करतो. कोणताही चित्रपट स्वीकारताना कथा ही सगळ्यात महत्त्वाची असते. कथा चांगली नसेल तर सुपरस्टारचे चित्रपट देखील फ्लॉप होतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी चित्रपटाची कथा वाचतो आणि मगच चित्रपट स्वीकारायचा आहे की नाही हे ठरवतो. 

Also Read : ​गोलमाल 4 मध्ये झळकणार हा मराठमोळा अभिनेता
Web Title: Will definitely work in the series if a series of definitive parts is offered: Sachin Khedekar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.